अमरावती : फ्रेजरपुराचे ठाणेदार राहुलकुमार आठवले यांच्यावरील ‘अटॅच’च्या कारवाईला काहीअंशी कारणीभूत ठरलेल्या दस्तुरनगरस्थित इलेक्ट्राॅनिक्स व सोफा चेअर्स प्रतिष्ठानातील दोन कोटी रुपयांची चोरी आता पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे. फारशी खातरजमा न करता गुन्हा नोंदविला खरा, मात्र झाली ती चोरीच हे सिद्ध करण्यासाठी आता पोलिसांना मोठी कसरत करावी लागणार आहे. ‘त्या’ इलेक्ट्राॅनिक्समधील चोरीचा तो सिलसिला संशयास्पद ठरला आहे.
काका व अन्य अकरा जणांनी आपल्या प्रतिष्ठानातून दुचाकी, एलईडी, गिफ्टस व तब्बल दोन कोटी सात लाख ५० हजार रुपयांचे फर्निचर चोरले, अशा पुतण्याच्या तक्रारीवरून ३० डिसेंबर रोजी फ्रेजरपुरा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. नेमक्या त्याच दिवशी संबंधित ठाणेदारांना मुख्यालयी अटॅच करण्यात आल्याने आता वेगळीच चर्चा ऐकायला मिळत आहे.
फुटेज का नाही पाहिले?
कुठेही मोठी चोरी झाली किंवा चेन स्नॅचिंग झाली, तर सीसीटीव्ही फुटेज तपासले जाते. फुटेजमुळे घटनेची खातरजमा केली जाते. सीसीटीव्ही फुटेजमुळे तर साईनगरमध्ये झालेला ३९२ खोटा असल्याचे निष्पन्न झाले होते. फुटेजची इतकी मोठी महती असताना ज्या प्रतिष्ठानातून दोन काेटी सात लाख ५० हजारांचा मुद्देमाल चोरीला जातो, त्या घटनेत तर गुन्हा दाखल करण्यापूर्वी सीसीटीव्ही फुटेज पाहणे अनिवार्य होते. मात्र ते त्यावेळी पाहिले नसल्याचे दस्तुरखुद्द फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले. त्यामुळे दोन कोटींचा मुद्देमाल चोरीला गेला असताना त्याचवेळी दुकानातील व नजीकच्या ठिकाणचे फुटेज का पाहण्यात आले नाहीत, हे अनुत्तरित आहे.
आठवडाभर चोरी?
हा संपूर्ण घटनाक्रम २३ ते ३० डिसेंबरदरम्यान घडला, असे तक्रारीत नमूद आहे. म्हणजेच चोरी एक दिवस झाली नाही. त्यामुळे दोन कोटी रुपयांचे फर्निचर चोरून नेले, हे विश्वासार्ह वाटत नाही. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे चोरीची अधिकृत नोंद करण्यात आली. त्यामुळे घटनेच्या पहिल्याच दिवशी चोरीची तक्रार का नोंदविण्यात आली नाही. दोन कोटींचे फर्निचर, दुचाकी फिर्यादीच्या डोळ्यादेखत की अपरोक्ष चोरून नेण्यात आले, हेदेखील अनुत्तरित आहे.
त्या प्रतिष्ठानातील सीसीटीव्हीचा डिव्हीआर ताब्यात घेतला आहे. त्यातील फुटेज तपासण्यात येईल. तक्रारकर्त्याने न्यायालयीन वादाचा मुद्दा अधोरेखित केला आहे. ते नेमके आदेश काय, ताबा कुणाचा तेदेखील अभ्यासले जाईल.
नितीन मगर, प्रभारी ठाणेदार, फ्रेजरपुरा