अमरावती : शहरात अलिकडे गांजाची चोरटी वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून राजापेठ पोलिसांनी एका चारचाकी वाहनातून तब्बल ८.४९ लाखांचा गांजा जप्त केला. विशेष म्हणजे तो दोन पोती गांजा अद्रकाच्या ३६ पोत्यांमागे दडवून ठेवण्यात आला होता. तपासणीदरम्यान ही गांजा तस्करी उघड झाली. २ फेब्रुवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास राजापेठ पोलिसांनी ही कारवाई केली.
(एमएच २७ एक्स ६४८३) या चारचाकी वाहनात गांजा घेऊन दोघेजण बडनेराहून नागपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती ठाणेदार मनीष ठाकरे यांना मिळाली. त्यांनी सायंकाळी ७.३० च्या सुमारास बायपास रोड चौकात कृष्णा मार्बलसमोर सापळा रचण्यात आला. रात्री ९.१५ च्या सुमारास ते वाहन दिसताच थांबविण्यात आले. त्यातील दोघांनी स्वत:ची ओळख विजय रामेश्वर इंगळे (वय ३८, रा. बोरगावपेठ, ता. अचलपूर) व अमोल रमेशराव पेटकर (३७, रा. विलासनगर, अमरावती) असे सांगितले.
त्या वाहनाची झाडाझडती घेतली असता, अद्रकाची ३६ पोती व त्याखाली दोन पोत्यांमध्ये गांजा आढळून आला. त्यांच्याकडून ७ लाखांचे वाहन, १.८० लाख रुपये किमतीची ३८ पोती अद्रक व ८.४९ लाख रुपये किमतीचा ४२ किलो ४८० ग्रॅम गांजा असा एकूण १७ लाख २९ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुध्द राजापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांनाही चार दिवस कोठडी
दोन्ही अटक आरोपींना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, उपायुक्त विक्रम साळी, सहायक आयुक्त भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मनीष ठाकरे, उपनिरीक्षक किसन मापारी, सागर सरदार, छोटेलाल यादव, नीलेश गुल्हाने, दिनेश भिसे, विकास गुळधे, प्रशांत गिरडे, नरेश मोहरील, दानिश शेख, मोहसीन शेख, प्रशांत वानखेडे यांनी केली.