समर्थकांना सवाल : प्रथमेशच्या न्यायासाठी लढणाऱ्यांची बैठकअमरावती : धामणगाव तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकरबाबा आश्रमशाळेतील विद्यार्थी प्रथमेश सगणे याचा नरबळी देण्याचे क्रूर कटकारस्थान करण्यात आले. तो नागपुरातील खासगी इस्पितळात उपचार घेत आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी पोलीस प्रशासन आणि शासनाने आरंभली असून पोलीस चौकशीत हा प्रकार नरबळीचा असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे समर्थकांनो, आणखी किती बळी घेणार, असा सवाल प्रथमेशच्या न्यायासाठी लढणाऱ्यांनी उपस्थित केला आहे. नरबळी देण्यासाठीच प्रथमेशचा ब्लेडने गळा चिरण्यात आल्याचे उघडकीस आले. या गंभीर प्रकरणातील दोषींना अभय देण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात आहे. महाराजांच्या भक्तांना यातून नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न एका निवेदनातून या मंडळींनी उपस्थित केला आहे. या गंभीरप्रकरणी पोलीस तपासातून चौकशीअंती नरबळी असल्याचे सिद्ध झाले असतानाही प्रथमेशचा जीव गेला नसताना तो नरबळी कसा, असा युक्तिवाद करून शंकरबाबाच्या समर्थकांनी या प्रकरणाची क्रूर थट्टा चालविली आहे. महाराजांच्या समर्थकांना प्रथमेशचा मृत्यू हवा होता काय, असा सवाल प्रथमेशसाठी लढणाऱ्यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीत उपस्थित केला. प्रथमेशऐवजी बाबांच्या समर्थकांच्या कुटुंबातील मुलांवर असा अघोरी अत्याचार झाला असता, तर त्यांनी असेच समर्थन केले असते काय? असा बोचरा प्रश्नही या बैठकीत उपस्थित करण्यात आला. या गंभीर प्रकरणी दडून असलेल्या दोषींवर कारवाई झाली तरच अशा अघोरी कृत्याला आळा बसू शकेल. अन्यथा आणखी एखादा नरबळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. निखळ मनाने मानवी दृष्टिकोन बाळगून अत्याचारग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार या बैठकीत झाला. यावेळीे दादासाहेब क्षीरसागर, राजाभाऊ हातागडे, गणेशदास गायकवाड, बबन इंगोले, देवानंद वानखडे, गोपाल प्रधान, सुधाकर खडसे, प्रभाकर वाळसे, विजय गायकवाड, गोपाल हिवराळे, विजय चव्हाण, प्रकाश खंडारे, भरत खडसे, गणेश कलाने आदी उपस्थित होते.
-तर प्रथमेशचा मृत्यू हवा होता काय ?
By admin | Published: August 23, 2016 11:57 PM