अंजनगाव सुर्जी : येथील सिताबई संगई एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शहरात विविध विद्यालये, महाविद्यालये, विनाअनुदानित संस्था चालविण्यात येतात. परंतु, सदर संस्थेमार्फत नियमांची पायमल्ली होत असल्याने त्याचा दूरगामी परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांनी वारंवार या संस्थेच्या कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. अल्पसंख्याक दर्जा असूनही नियमानुसार सदर संस्थेचे कामकाज चालविण्यात येते की नाही, त्या अनुषंगाने सदर संस्थेची चौकशी करण्याची विनंती अंजनगाव सुर्जी येथील माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी तक्रार वजा निवेदनातून नुकतीच केली आहे.
सदर संस्थेमार्फत चालविण्यात येत असलेल्या विविध शाळा, महाविद्यालयांची संख्या, अनुदानित, विनाअनुदानित तुकड्यांची संख्या, विद्यार्थी संख्या, एकूण विद्यार्थ्यांपैकी अल्पसंख्याक, धार्मिक, भाषिक आधारित विद्यार्थ्यांचे प्रमाण, शाळेत दिले जाणारे प्रवेश नियमाला धरून होतात की नाही, प्रवेश प्रक्रियेत नेमक्या कोणत्या त्रुटी आहेत, विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणी करतांना नियम पाळले जातात काय, संस्था शैक्षणिक गुणवत्तेच्या उदात्त हेतूने चालविल्या जाते की नफेखोरीच्या उद्देशाने, सदर संस्थेला अल्पसंख्याक दर्जा असूनही नियमानुसार कामकाज होत नसल्याच्या तर शालेय फी च्या नावावर विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळणे अशा अनेक तक्रारी वारंवार पालकांकडून होत आहेत. शासन शिक्षणाबाबत गंभीर असताना संगई शाळेचे संचालक मात्र अल्पसंख्याक दर्जाच्या नावाखाली सदर संस्था विद्यार्थिहिताला डावलून शिक्षणाचे बाजारीकरण करीत असेल, तर त्याला वेळीच पायबंद घालण्याची विनंती सदर तक्रारीतून माननीय शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे. संस्थेचे लेखापरीक्षण करविण्याचे आश्वासन ना. कडू ह्यांनी दिले असून,आगामी काळात संस्थेची चौकशी झाल्यास काय सत्य बाहेर येणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.