अमरावती : युवा स्वाभिनानच्या कार्यकर्त्यांनी नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात लेखी तक्रार केली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत युवा स्वाभिनानच्या कार्यकर्त्यांनी ही लेखी तक्रार दाखल केली आहे.
आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांना नागपूर येथील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी २० फूट गड्ड्यात गाडण्याची व स्मशानात गोवऱ्या रचून ठेवण्याची भाषा केली होती. तसेच, जातीवाचक शिवीगाळ व जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली, असे या तक्रारीत नमूद केले आले आहे. या प्रकरणी राऊत यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा(एक्ट्रोसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबतची लेखी तक्रार त्यांनी पोलीस आयुक्तांकडे सोपविली. यावेळी अॅड दीप मिश्रा, जितू दुधाने, विनोद गुहे व सचिन भेंडे उपस्थित होते. नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे अभिवचन दिले.
दरम्यान, राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री निवासस्थान मातोश्री येथे जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचे चॅलेंज दिले होते. त्यानुसार ते मुंबईत पोहोचले व त्यानंतर मुंबईत वातावरण चिघळले. हनुमान चालिसाचं प्रकरण आता राज्यभर गाजतयं. मुंबई पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत राणा दाम्पत्याला अटक केली आहे. अटकेसाठी गेलेल्या पोलिसांसोबत हुज्जत घातली, त्यांना धक्काबुक्की केल्याचा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात कलम ३५३ गुन्हा दाखल करण्यात आला. याची नोंद वेगळ्या एफआयआरमध्ये करण्यात आली आहे.
राणांकडून गंभीर आरोप; लोकसभा अध्यक्षांना पत्र
खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तुरुंगात मिळालेल्या वागणुकीबद्दल गंभीर आरोप केले. "मला २३ एप्रिल २०२२ रोजी खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. मी संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढली. मी पिण्यासाठी पाणी मागितले, पण मला रात्रभर पाणीही दिले नाही. पाणी मागितल्यामुळे मला जातीवाचक शिवीगाळ केली. मी अनुसूचित जातीची आहे, यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्कही नाकारण्यात आला." असे त्या म्हणाल्या. यानंतर आज मुंबई पोलीस आयुक्तांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये राणा दाम्पत्य पोलीस ठाण्यात चहा पित असताना दिसत आहे. दोघांसमोर पाण्याच्या बाटल्या आहेत. राणा दाम्पत्य खुर्चीत बसून चहा पित असताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. 'आम्ही अधिक काही बोलायची गरज आहे का?' असं पांडेंनी ट्विटसोबत म्हटलं आहे. त्यामुळे राणा यांच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.