अमरावती : बनावट धनादेशाद्वारे स्टेट बॅक आॅफ इंडियाची २२ लाख ६० हजाराने फसवणूक करणाऱ्या आरोपींनी बँक खात्यासाठी दिलेला पत्ताही चुकीचा असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात यावा, यासंदर्भात शहर कोतवाली पोलीस पत्र पाठविणार आहे. स्टेट बॅक आॅफ इंडियाच्या प्रबंधकाने दिलेल्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी दिनेश सुरजमल तिवारी, राकेश प्रकाश जैन व राजेश लखन मिश्रा यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. आरोपींनी कॅनरा बॅकेत खाते उघडून धारणी येथील प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नावे बनावट धनादेश तयार केले. ते धनादेश वटविण्याकरिता कॅनरा बँकेने स्टेट बँक आॅफ इंडियाकडे पाठविले होते. स्टेट बँकेनेही खात्री न करता धनादेश वटविण्यात आला. त्या धनादेशाद्वारे बॅकेतून पैसे काढण्यात आले. याप्रकरणाची चौकशी सुरु झाल्यावर पोलिसांनी आरोपीच्या बँक खात्यातील पत्त्याची खात्री केली असता आरोपी तेथे नसल्याचे आढळून आले. आरोपींनी बँकेला खाते उघडण्याकरिता दिलेले दस्ताऐवज सुध्दा बनावट असल्याचा संशय पोलिसांना आला आहे. आता पुढील तपासकरिता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
धनादेश प्रकरणातील आरोपींचा पत्ता चुकीचा
By admin | Published: January 13, 2016 12:14 AM