अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे एक्स-रे मशीनसाठी लागणाऱ्या फिल्म संपल्याने मागील चार दिवसांपासून ज्या रुग्णांचे एक्स-रे करण्यात आले आहे, त्यांना एक्स-रेचा अहवाल मात्र अजूनही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे जो पर्यंत फिल्म नाही तो पर्यत अहवाल नाही अशी काहीशी परिस्थिती रुग्णालयात असल्याने जवळपास एक हजार रुग्णांचे एक्स-रे अहवाल अडकून आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रोज सरासरी १५० ते २०० च्या जवळपास रुग्ण हे एक्स-रे काढण्यासाठी येतात. अपघातग्रस्त रुग्णांचे निदान करण्यासाठी तातडीने एक्स-रे काढणे हे गरजेचे असते. तसेच आठवड्यातील दर बुधवारी दिव्यांग बांधवांची तपासणी होते. त्यामुळे या दिवशी एक्स-रे साठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे जास्त मोठ्या प्रमाणावर येते. एक्स-रे च्या अहवाल नंतरच संबधित रुग्णांवर आवश्यक ते उपचार केले जातात. परंतु रुग्णालयातील ज्या फिल्मवर अहवाल छापला जातो त्या फिल्मचा साठाच संपल्याने रुग्णांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे एक्सरे विभागातून रुग्णांना आज एक्स-रे करा अहवालासाठी चार दिवसांनी या असे सांगण्यात येत आहे. मागील चार दिवसांपासून फिल्म नसल्याने जवळपास एक हजार रुग्णांचे अहवाल अजूनही त्यांना प्राप्त झालेले नाहीत.
एक्स-रे साठी आवश्यक फिल्म दोन ते तीन दिवसांपासून संपली आहे, रुग्णांची गैरसोय लक्षात घेता तातीने फिल्म मागविण्यात आले आहे. गुरुवारी या फिल्म रुग्णालयाला प्राप्त होतील - डॉ. दिलीप सौंदळे.