अमरावती : आपली मुलं परदेशात पाठवायची व इथल्या तरुणांमध्ये अस्वस्थता पसरवायची, असं करणं एका डॉक्टरला शोभत नाही, असा टोला लगावत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केलेल्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान डॉ. बोंडे यांच्याविरुद्ध अमरावतीत तक्रार दाखल करण्यात आली.
महागाई. बेरोजगारीवरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारकडून दंगली घडविल्या जात असल्याचा आरोप करीत, मनसे प्रमुख राज ठाकरे हे भाजपची सी टीम' असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. डॉ. बोंडे यांनी अॅड. यशोमती ठाकूर या अचलपूर घटनेच्या मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप केला होता. ठाकूर यांनी त्यांना त्यांच्याच शब्दात उत्तर दिले आहे.
पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले अनिल बोंडे भाजपमध्ये गेले आणि पराभूत झाले तेव्हापासून त्यांचे डोके ठिकाणावर नाही. मागच्या वेळी जेव्हा दंगल झाली, त्यावेळी लोकांना त्यांनी उद्युक्त केले होते आणि आताही ते लोकांना भडकवत आहेत. अमरावतीमधील सलोख्याचे वातावरण बिघडविण्याचे काम बॉडेसारखी मंडळी करीत आहे. मात्र, आपण हे सलोख्याचे वातावरण आहे तसेच राहायला हवे असा प्रयत्न करणार, असे अॅड. ठाकूर म्हणाल्या.
डॉ. बॉडे यांच्याविरुद्ध तक्रार
पालकमंत्री यशोमती ठाकूर या अचलपूर घटनेच्या मास्टरमाइंड असल्याचा आरोप करणारे भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव हरिभाऊ मोहोड यांनी याबाबत मंगळवारी दुपारी तक्रार नोंदविली. तक्रारीला गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी दुजोरा दिला. बोंडे यांनी प्रसारमाध्यमांमध्ये धादांत खोटे व बिनबुडाचे आरोप करून पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची व शासनाची बदनामी केली. त्याचबरोबर समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने डॉ. बोंडे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी तक्रार मोहोड यांनी केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.