अमरावती : ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत संचालक पदासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर या नामांकन दाखल करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता दोन पालकमंत्री, चार आमदार आणि सहकार क्षेत्रातील नेत्यांच्या उमेदवारीने चुरस वाढणार आहे.
बँक निवडणुकीत नामांकन दाखल करण्यासाठी सोमवार, ६ सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे. २१ संचालक आणि १६८६ मतदार संख्या अशी जिल्हा बँक निवडणुकीची खाशीयत आहे. शुक्रवारपर्यंत ११८ उमेदवारांनी संचालकपदासाठी नामांकन दाखल केले आहे. सोमवारी ना. यशोमती ठाकूर यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख हेदेखील नव्याने नामांकन अर्ज दाखल करतील, असे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार बळवंत वानखडे, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रकाश भारसाकळे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके आदींनी संचालक पदासाठी नामांकन दाखल केले आहे. तर, पडद्यामागून आमदार प्रताप अडसड हे या निवडणुकीत ‘गेम मास्टर’ची भूमिका बजावत आहे. जिल्हा बँक निवडणुकीत सर्वच राजकीय नेते मैदानात उतरल्याने नेमके बँक निवडणुकीत आहे तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. ८ ते २२ सप्टेंबर दरम्यान नामांकन मागे घेण्याचा अवधी आहे. कोण मैदान साेडते, याकडे नजरा खिळल्या आहेत. आता या निवडणुकीत ‘आगे आगे देखो, होता है क्या?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र, आतापर्यंत मंत्री, आमदारांनी संचालकपद काबीज करण्यासाठी उमेदवारी अर्ज सादर केल्याने या निवडणुकीला महत्त्व आले आहे.
-------------------
- तर जिल्हा बँक निवडणुकीत येणार रंगत
पालकमंत्री यशोमती ठाकूर या सोमवारी संचालकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ना. ठाकूर यांनी सहकार क्षेत्रात ‘एन्ट्री’साठी गत दोन दिवसांपासून तिवसा, मोझरी येथील सहकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. त्यांचे नामांकन कायम राहिल्यास जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर, बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची जिल्हा बँक निवडणुकीत एकजूट आहे. सहकार पॅनेल या नावाने पुन्हा बँकेवर संचालक मंडळ आणण्याची रणनीती आखली जात आहे.