तिवसा (अमरावती) : कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी मतदारसंघात पोहोचताच तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथील शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. गुरुवारी पहाटे झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तालुक्यात ३३०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील शेतीपीक व संत्रा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर ठाकूर यांनी बांधावर जाऊन शेतक-यांशी संवाद साधला.
नुकसान भरपाई लवकरच मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांच्या समवेत महसूल व तहसील यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते. ठाकूर यांनी दीपक सावरकर यांच्या केळीच्या बागेत व राजू घरडे यांच्या कपाशीच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी केली.
गत काळातील अवेळी पाऊस आणि आताही गारपिटीने अमरावतीसह विदर्भातील कापूस, तूर आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी दोन दिवसांत नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना यावेळी ना. यशोमती ठाकूर यांनी कृषि विभागाला दिल्या. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांना माहिती देण्यात आली आहे. शेतक-यांच्या मदतीचा प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मांडण्यात येईल. संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे काम निश्चितपणे करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.