चक्काजाम : पोेलीस बंदोबस्त तैनात, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : बाजार समितींना नाफेडद्वारे तूर खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, तरीही मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर खरेदी बंदच असल्याने अनेक शेतकऱ्यांची तूर यार्डातच पडून आहे. हैराण शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्यासाठी आ. यशोमती ठाकूर यांनी पुढाकार घेतला आणि तूर खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी आक्रमक पावित्रा घेऊन मोर्शी येथे चक्का जाम आंदोलन केले. अखेरीस या आंदोलनाच्या धसक्याने बाजार समितीमध्ये नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी सुरू झाली. आ. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात शेकडो त्रस्त शेतकऱ्यांनी दुपारी २ वाजता बाजार समितीमध्ये चक्काजाम आंदोलन सुरू केले. यशोमतींचा आक्रमक पवित्रा व शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहून बाजार समिती पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले तणावजन्य स्थितीची शक्यता लक्षात घेता बाजार समिती परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे बाजार समितीला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी शासनाच्याविरोधात घोषणा देऊन केंद्र व राज्य शासनाचा निषेध केला व शेतकऱ्यांची पडून असलेली हजारो क्विंटल तूर खरेदी सुरू करण्यास भाग पाडले. यशोमतींच्या आंदोलनाच्या धसक्याने नाफेडतर्फे ५ वजन काटे लाऊन तूर खरेदी सुरू करण्यात आली उद्या बुधवारपासून या वजन काट्यांवर नियोजनबद्ध पद्धतीने तूर मोजणी प्रक्रिया सलग सुरू राहिल व शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, असे पत्र मोर्शीच्या तहसीलदारांकडून प्राप्त झाल्यानंतरच आ. यशोमती ठाकूर यांनी आंदोलन मागे घेतले.राज्य शासनाची तूर खरेदी बंद करून यानंतरची तूर खरेदी नाफेडच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या बाजार समितीसमोर रांगा लागल्या होत्या. मात्र, नाफेडचे तूर मापनाचे कार्यालय सुद्धा बंद होते. निर्धारित वेळी तूर खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली गेली.प्रशासन नमलेमोर्शी : याची माहिती आ. यशोमती ठाकूर यांना मिळताच त्यांनी बाजार समितीसमोर चक्काजाम आंदोलन पुकारले आणि संबंधितांना तूर खरेदी सुरू करण्यास भाग पाडले. यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. आंदोलनात संजय कळस्कर, गजानन चरपे, अभिजित मानकर, रमेश काळे, संजय मोहोकर, नईमखान, प्रफुल्ल राऊत, दिनेश अंधारे, रूपेश वाळके, समीर विघे, निखिल फलके, शशांक अमदरे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर शिल्लक असतानाही ती मोजली जात नाही. नाफेडने तूर उत्पादकांना वाऱ्यावर सोडले आहे. तूर खरेदीवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तूर मोजणीत व्यत्यय येत आहे. अनेक दिवसांपासून हिच स्थिती असल्याने आता शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे. हा आक्रोश उफाळून येऊ शकतो. - यशोमती ठाकूर आमदार, तिवसा
यशोमतींचा धसका; तूर खरेदी सुरू
By admin | Published: May 17, 2017 12:01 AM