अमरावती : विदर्भस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत यवतमाळ संघ अजिंक्य ठरला. अंतिम सामन्यात दोन गोलने आघाडी घेत यवतमाळ संघाने अमरावती संघाला मात दिली. यात अमरावती संघ उपविजेता राहिला. रविवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास रंगलेला हा सामना बघण्यासाठी क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती.
शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती व अमरावती हॅण्डबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या मैदानावर ६ व ७ फेब्रुवारी रोजी डॉ पंजाबराव देशमुख स्मृती चषक विदर्भस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात विदर्भातून १४ संघ सहभागी झाले होते. सर्वांना नमवूृन अमरावती (ए) व यवतमाळ (बी) संघात अंतिम सामना रंगला. अटीतटीच्या या समान्यात यवतमाळ संघाने २०-१८ गोलने आघाडी घेतली. यामध्ये दोन गोल अधिक घेऊन यवतमाळ विजेता ठरला. तेज बनसोड हा मॅन ऑफ द सिरीज ठरला. सामन्याचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कार्यकारिणी सदस्य तथा प्राचार्य व्ही. जी ठाकरे होते.
स्वागताध्यक्ष प्राचार्य स्मिता देशमुख होत्या. विजेता संघाला संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांच्या हस्ते पारितोषिक व स्मृतिचिन्ह व रोख देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ. पंजाबराव देशमुख बँकेचे अध्यक्ष राजेंद्र महल्ले, प्राचार्य स्मिता देशमुख, अंजली ठाकरे, भाऊ बेलसरे, नंदकिशोर कांडलकर, नितीन चांगोले, स्पर्धा संयोजक सुभाष गावंडे उपस्थित होते.