नव्याने संकेत स्थळ सुरु होण्याची प्रतीक्षा, विद्यार्थी पुन्हा सीईटी तयारीला लागले
अमरावती : इयत्ता दहावीचा निकाल लागल्यावर आता अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहे. त्यानुसार ऑनलाईन आवेदनपत्र भरणे सुरू असतानाच संकेतस्थळातच तांत्रिक बिघाड आल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अद्याप अकरावी सीईटी परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरला नाही किंवा भरत असताना तांत्रिक अडचणी आल्या असतील त्यांना तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल, असा सुतोवाच शिक्षण बोर्डाने केला.
२० जुलै ते २६ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. अकरावी सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सीईटी डॉट महा एसएससी डॉट एसी डॉट इन हे संकेतस्थळ देण्यात आले असून विद्यार्थ्यांंना ऑनलाइन अर्ज सादर करीत होते. पण, हे संकेतस्थळी तांत्रिक बिघाडामुळे बंद ठेवण्यात आले आहे. अर्ज भरण्याची ऑनलाईन सुविधा पूर्ववत सुरू झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल आणि या परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी स्पष्ट केले आहे. तथापि, अकरावी सीईटी परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बोर्डाने लवकर ही तांत्रिक अडचण दूर करावी, अशी अपेक्षा परीक्षार्थी आणि पालकांना आहे. इंग्रजी, गणित (भाग १ व भाग २), विज्ञान व तंत्रज्ञान (भाग १ व भाग २), सामाजिक शास्त्र (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) असे प्रत्येकी २५ विषयाचे गुण मिळून १०० गुणांची सीईटी परीक्षा होणार आहे.
बॉक्स
सीईटी संकेतस्थळ हॅक
१) सन २०२१-२२ च्या अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात सीईटी ऑनलाईन आवेदन पत्र सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी बंद ठेवणेबाबत बोर्डाने पत्र काढले आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी वेबसाईट वारंवार हॅक होत असल्याने ती बंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. शिवाय २० आणि २१ रोजी अनेकदा हे संकेतस्थळ बंद झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी बोर्ड तसेच शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या होत्या. तांत्रिक अडचणी दूर करून ही सुविधा पूर्ववत करण्याचे प्रयत्न बोर्डाकडून केले जाणार आहे.
कोट
सीईटी तयारी कशी कराल?
अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा ही दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असून ओएमआर उत्तरपत्रिकाद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक असून यासाठी ऑनलाईन नोंदणी संकेतस्थळावर करायची आहे. दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १०० गुणांची परीक्षा राहील. सीईटीच्या आधारावर गुणवत्तेवर प्रवेश राहील. त्यानंतर परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दहावीच्या पद्धतीनुसार होईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मात्र ही सीईटी न देताही अकरावीत प्रवेश देता येणार आहे. दहावीच्या अभ्यासक्रमावर ही परीक्षा आहे.
- अरविंद मंगळे, शिक्षण तज्ज्ञ.
----------------
दहावी पास विद्यार्थी: ४०४३८
अकरावीसाठी शहरी भागात एकूण जागा : १५३६०
शाखानिहाय जागा
कला शाखा : ३३७०
वाणिज्य शाखा : २४०३
विज्ञान शाखा : ६५४०
संयुक्त शाखा : ३०२०