कोरोना इफेक्ट : चिमुकल्यांच्या आनंदावर विरजण
चांदूर बाजार : दरवर्षी विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा संपताच महिला भगिनींची माहेरी जाण्याची तयारी सुरू होते. उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला जाऊ, असे म्हणत मुलेही एप्रिल-मेची वाट पाहत असतात. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता, बाहेरगावी जाणे दुरापास्त ठरत असून, महिलांना माहेर आणि चिमुकल्यांना मामाचे गाव अद्याप दूरच असल्याचे दिसून येत आहे.
कधी एकदाची वार्षिक परीक्षा संपते अन् केव्हा शाळेला सुट्ट्या लागतात, याची प्रचंड उत्सुकता शाळकरी मुलांना असते. एकदा का शाळेला सुट्या लागल्या की, मामाचा गावी जाऊन मजा करण्याची पद्धत आजही ग्रामीण भागात रूढ आहे. परंतु, यावर्षी परीक्षा ऑनलाईनच आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्या लागण्याच्या आधीपासूनच मुले घरीच आहेत. यासोबतच राज्य शासनाकडून कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य घरातच आहे. त्यामुळे बाहेरगावी जाणे दुरापास्त झाले आहे.
शासनाने ‘ब्रेक द चेन’च्या नावावर राज्यभर संचारबंदी जाहीर केली. आपल्याच शहरात अकारण बाहेर पडणेही महागात पडणार आहे. यात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा मार आणि गुन्हे दाखल होण्याच्या कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे. आता अशा स्थितीत महिला भगिनींच्या माहेरी जाण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरले. त्यातच चिमुकल्यांनासुद्धा मामाच्या गावाला जाण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. हीच परिस्थिती गतवर्षीसुद्धा असल्याने मामाचे गाव दोन वर्षांत दुरावल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मौजेला मर्यादा
चिमुकले मामाच्या गावाला जाऊन नदीत पोहण्याची मजा लुटतात. शेतात, जंगलात मनसोक्त फिरणे, आंबे खाणे, बालपणीच्या सवंगड्यांसह खेळणे अशा मौजमजेत ही मुले हरवून जातात. मात्र, यावर्षीदेखील गतवर्षीचे चित्र आहे. त्यामुळे चिमुकल्यांचा उत्साह दोन ते तीन महिने लांबला आहे. महिलांनासुद्धा प्रत्यक्ष भेट न देता, पुन्हा एकदा माहेरच्या आठवणीत हे वर्ष घालवावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
--------------