लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. यापार्श्वभूमीवर रविवारी रात्री उशिरा मृग नक्षत्राला सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने ती यथेच्छ पावसात डुंबणार असल्याचा पंचागकर्त्यांचा अंदाज आहे. जिल्ह्यात १० जूननंतर पावसाला व १५ जूननंतर मान्सूनला प्रारंभ होण्याचा हवामानतज्ज्ञांचा अंदाज असल्याने शेतकरी सुखावला आहे.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७.२८ लाख हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. यंदा कपाशीच्या क्षेत्रात १५ ते २० हजार हेक्टरने घट होऊन किमान २८ ते ३० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची क्षेत्रवाढ होऊ शकते, असे कृषी विभागाने सांगितले. प्रस्तावित क्षेत्रानुसार यंदा कपाशीचे दोन लाख ६१ हजार हेक्टर, सोयाबीन दोन लख ६८ हजार हेक्टर, तूर एक लाख १० हजार हेक्टर, मूग ३० हजार हेक्टर, ज्वारी ३० हजार हेक्टर, उदीड १० हजार हेक्टर, मका नऊ हजार हेक्टर व इतर पिकासाठी नऊ हजार ६१२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत बियाणे व खतांची उपलब्धता असली तरी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असल्यास घरचे सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती तपासून व बीजप्रक्रिया करून पेरणी करावी व साधारणपणे ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर व जमिनीत पाऊस मुरल्याची खात्री करून पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने विभागाने केले आहे.
१० जूननंतर वाढणार पावसाचे प्रमाणश्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते १० जूननंतर जिल्ह्यासह विदर्भात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या परिस्थितीमुळे यंदा मान्शूनचे आगमन मुंबईऐवजी आंध्रप्रदेशाकडून होण्याची शक्यता आहे.
‘लॉकडाऊन’ मुळावरखासगी बाजारात आधारभूत किमतीपेक्षा कमीने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी पणन अन् सीसीआयची आस धरली, नोंदणीच्या शनिवार या अखेरच्या दिवसांपर्यंत अद्याप २४ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस खरेदी व्हायची आहे. अडीच महिन्यांपासून सुरू असलेले ‘लॉकडाऊन’ शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे
पीककर्जास बँकांची ‘ना’बँकांचा पीककर्ज वाटपाचा टक्का १० वरच अडकलेला आहे.जिल्ह्यात १.३१ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. मात्र, हे सर्व शेतकरी थकबाकीदार आहेत. कर्जमाफीतील दोन लाखांच्या कर्जाची शासनाने हमी घेतली. आदेश जारी केलेत. तरीही बँका जुमानत नसल्याने बी-बियाण्यांची तजविज कुठून करावी, असा प्रश्न उभा ठाकला आहे.