बडनेरा ( श्यामकांत सहस्रभोजने ) : गतवर्षी कोरोना संसर्गामुळे मंदिरांची दारे कडेकोट बंद होती. दर्शन तर दूर, परिसरात चिटपाखरूही फिरकणार नाही, अशी स्थिती होती. यंदाच्या श्रावणात मंदिर प्रवेश मिळावा, अशी दाट इच्छा भाविक बाळगून आहेत. यावर्षीचा श्रावण ३० दिवसांचा आला असून त्यामध्ये पाच सोमवार आले आहेत.
यंदा श्रावण महिना ९ ऑगस्टला सुरू होतो आहे. तो ६ सप्टेंबर म्हणजेच पोळ्याच्या दिवशी संपेल. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचा प्रकोप सुरू झाला. तो तब्बल सहा ते सात महिने सुरूच होता. याच दरम्यान श्रावण महिना आला. लॉकडाऊनमुळे सर्वच ठप्प होते. गर्दीचे ठिकाण म्हणून देशभरातील मंदिरे बंद ठेवण्यात आली. ती अजूनपर्यंत सुरू झालेली नाही. कोरोनाला थोपविण्यासाठी भाविकांनीसुद्धा शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले. कुठल्याच मंदिरावर चिटपाखरूदेखील फिरकणार नाही, अशी शांतता होती. पहिल्या लाटेचा भर ओसरल्यानंतर भाविकांमध्ये मंदिरे सुरू करण्याची मागणी प्रकर्षाने समोर आली. यंदा तरी श्रावण महिन्यात मंदिरात जाऊन शिवलिंगाचे प्रत्यक्ष दर्शन घेता येईल, अशी प्रचंड इच्छा जिल्ह्यातील सर्वच भाविक भक्त बाळगून आहेत. सध्या मंदिरांच्या बंद प्रवेशद्वाराजवळ जाऊन भाविक दर्शन घेत आहेत. यावर्षीच्या श्रावणात मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेण्याची अनुमती शासन, प्रशासन स्तरावर देण्यात यावी, असे शिवभक्तांमध्ये बोलले जात आहे. शिवाला मानणारा सर्वत्र मोठा भक्त वर्ग आहे. कोरोना संसर्गाची धार जशी जशी कमी होत आहे, त्या प्रमाणात बरीच शिथिलता आणण्यात आली आहे. रेल्वे, बस व इतरही गर्दीची ठिकाणे सुरू करण्यात आली, मग मंदिरांवरच निर्बंध का, असा प्रश्न विचारला जात आहे. मंदिर परिसरातील व्यवसायदेखील ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेकांची कुटुंबे आर्थिक डबघाईस आलेली आहेत.
----------------------
* श्रावण सोमवार*
*पहिला सोमवार ९ ऑगस्ट
*दुसरा सोमवार १६ ऑगस्ट
*तिसरा सोमवार २३ ऑगस्ट
*चौथा सोमवार ३० ऑगस्ट
*पाचवा सोमवार ६ सप्टेंबर
----------------------
बॉक्स:
९ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात
यंदा ९ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. गतवर्षीदेखील कोरोनामुळे भाविक भक्तांसाठी मंदिरे बंदच होते. यावर्षीदेखील अद्याप तरी खुले झालेले नाही. केवळ पुजारी मूर्तिपूजा करतो. त्यासाठीच परवानगी आहे. भाविक भक्तांना मंदिरात प्रवेश करून दर्शन घेण्याची परवानगी मिळालेली नाही.
------------------------------
*मंदिर परिसरातील व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया*
1) श्रावण महिना जवळ येऊन ठेपला आहे. कोरोना संसर्गामुळे गतवर्षी मंदिर परिसरात आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता. अजूनही तशीच परिस्थिती आहे. यावर्षीच्या श्रावणात भाविकांसाठी मंदिरे खुली झाल्यास व्यवसायाला काहीशी उभारी येईल.
- दिगंबर लांडोरे, विक्रेते, कोंडेश्वर.
2) कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाले आहे. आर्थिक कंबरडे मोडले आहे. यंदाच्या श्रावण महिन्यात भाविक भक्तांसाठी मंदिरे खुली केल्यास काहीसा दिलासा मिळेल. शासन, प्रशासनाने त्या दृष्टीने पावले उचलावीत.
- प्रशांत गुजर, विक्रेते,कोंडेश्वर.
-----------------------------