चांदूर बाजार : कोरोना निर्बंधामुळे सार्वजनिक पोळा उत्सवावर गतवर्षी विरजण पडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या दैवतांची घरीच पूजा उरकून गोठ्यातच त्यांना बांधून ठेवावे लागले. परिणामी शेतकऱ्यांना पोळा सणाच्या आनंदाला मुकावे लागले. यावर्षीही पोळ्यावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या ‘अमावस्ये’चे सावट राहणार का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
कोरोना संसर्ग बऱ्यापैकी निवळला असतानाही राज्यात आतादेखील सण, उत्सवांना परवानगी नाही. त्यामुळे यावर्षीही बैलांचा पोळा सण, सार्वजनिकरित्या साजरा करता येणार की नाही, याबाबत शेतकरी वर्ग संभ्रमात आहे. पोळा हा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु, अद्यापही याबाबत प्रशासनाकडून कोणत्याच सूचना नाहीत. गतवर्षी पोळा सणाच्या आठ दिवसांआधीच प्रशासनाच्या सूचनेवरून ग्रामपंचायतीकडून गावात मुनादी देऊन सार्वजनिक पोळा न भरविण्याची सूचना देण्यात आली होती. शहरातील बाजार पोळ्यानिमित्त,बैलांसाठी लागणार्या साज - सिंगाराने सजला आहे. परंतु, पोळ्याचा सार्वजनिक सण साजरा होण्याबाबत शेतकरी साशंक आहेत. त्यामुळे बैलांच्या साज- शिंगाराचे साहित्य खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. परवानगी आली तर सार्वजनिक पोळ्यात सहभाग घेऊ, अन्यथा घरीच बैलांचे पूजन, ओवाळणीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.
---------------
असा होतो पोळा उत्सव
पोळ्याच्या आदल्या दिवशी शेतकरी बैलांची खांदेमळणी करून त्यांना पोळ्याच्या दिवशी जेवायला येण्याचे आमंत्रण देतात. पोळ्याच्या दिवशी बैलांना तलावात आंघोळ घालून, खरारा करून त्यांची रंग-रंगोटी केली जाते. बैलांना मठाटी, चवर, घंटा, कवड्यांची माळ, घुंगरांची माळ,मोर पिसांचा साज, बाशिंग बांधून, बैलांवर नक्षिकाम केलेली कापडाची झूल चढविली जाते. नंतर बैलांना वाजतगाजत, गावाच्या वेशीवर आणलेल्या जाते. या ठिकाणी गावातील सर्व बैल एकत्रित आणून, बैलांचा सार्वजनिक पोळा भरविण्याची परंपरा हजारो वर्षांपासून आजही कायम आहे.
----------------