फोटो - चांदूर बाजार १६ एस
सुमीत हरकुट - चांदूर बाजार - घाटाच्या गुळासाठी सुप्रसिद्ध असलेल्या चांदूर बाजार तालुक्यात पिवळा भेसळयुक्त गुळाची मोठ्या प्रमाणात विक्रीही केली जात आहे. रवेदार तसेच आरोग्यास गुणकारी असलेल्या घाटाच्या गुळाची आजही मागणी आहे. मात्र, ती तालुक्याबाहेरच जास्त असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जाते. घाटाचा गूळ व सेंद्रिय गुळाच्या नावावर नागरिक रसायनयुक्त पिवळ्या गुळाला तालुक्यातील नागरिकांकडून वापर केला जात आहे.
गुळाला पिवळा रंग येण्यासाठी सल्फरची पावडर मिसळण्याची पद्धत आहे. मात्र, सरकारने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा गुळात जास्तच भेसळ होत आहे. त्यासोबत अन्य काही रसायनेसुद्धा मिसळली जात आहेत. याकडे अन्न सुरक्षा विभागाने कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. या पिवळ्या व स्वछ दिसणाऱ्या गुळात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रेग्यूलेशन २०११ च्या कायद्यानुसार गुळात जास्तीत जास्त ७० पीपीएम इतके सल्फर डायऑक्साईड वापर करण्याची परवानगी आहे. परंतु, यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने गूळ तयार करणारे आपल्या अंदाजाने सल्फर मिसळत असतात. मुळात हे प्रमाण ३५० ते १००० पीपीएम सुद्धा असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातो. कोणत्याही पदार्थांना अधिक पिवळेपणा येण्यासाठी ‘मेटॅनिल येलो’ ही रासायनिक पूड वापरली जाते.
हळदीतही ‘मेटॅनिल येलो’चा वापर
हळद पावडरमध्ये मेटॅनिल येलो पूड वापरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे गूळ पिवळाधमक करण्यासाठी काही ठिकाणी मेटॅनिल येलो या रसायनाचा वापर केला जातो. त्यानंतर वापरला जाणारा घटक म्हणजे सोडियम बायकार्बोनेट हा आहे. सर्वसाधारणपणे गूळ तयार करण्यासाठी सर्रास सोडियम कार्बोनेटचा वापर होत असतो. याशिवाय झेडएफएस आणि सोडियम हाड्रोफॉस्फेट, कॅल्शियम कार्बोनेट अशा रसायनाचा उपयोग गुळाला अधिकाधिक चमकदार करण्यासाठी केला जातो.
जीवघेणे आजार होण्याची शक्यता
रसायनाचा अधिक वापर केल्याने अनेक जीवघेणे आजार होण्याची शक्यता असते. यामुळे रसायनाचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने गूळ तयार करणे हे आरोग्यासाठी हितावह ठरते. मात्र, नफा मिळवण्याच्या नादात याकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवत असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे. यामुळे गूळ खरेदी करताना नैसर्गिकपणा तपासणे गरजेचे झाले आहे.
अशी होते गूळनिर्मिती
सर्वसाधारणपणे गुळाची निर्मिती करताना गुळाचा रस उकळला जातो. त्यावेळी त्यातील कचरा काढण्यासाठी चुना टाकला जातो. त्यानंतर त्यात भेंडीच्या पानांची पावडर टाकली जाते. त्यामुळे गुळाला चव येते.