अमरावती - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून पोहोरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर आज त्यांनी अमरावतीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पोहरादेवीकडे मी पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे म्हणून आशिर्वाद नाही मागितला. मी राज्यातील या गद्दारांचे आणि राजकारणाची पातळी जी घसरत चालली आहे त्यांना थोपविण्याचा आशिर्वाद मागितला आहे. या राजकारण्यांमधील गद्दारी जाऊदे ही प्रार्थना केल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटले. तसेच, टीका करणाऱ्यांनाही टोला लगावला. तसेच, होय मी मतांची भीक मागायलाच आलोय, असे म्हणत टीकाकारांवर पलटवार केला.
उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा आज दूसरा आणि शेवटचा दिवस आहे. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरुन भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना कधीही विदर्भ दौरा केला नाही व कोणत्याही प्रकारची मदत विदर्भाच्या लोकांना केली नाही. मात्र, त्यांना काय कळवळा आला की, ते विदर्भ दौरा करत आहेत. हे फक्त नौटंकी असून देखावा आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली. उद्धव ठाकरेंनी अमरावतीतील दौऱ्यात टीकाकारांना सुनावले.
काही बोगस लोकं म्हणतात की, मी मतांची भीक मागायला आलोय. होय, मी मतांची भीकच मागायला आलोय. कारण, मी मतदान करणाऱ्या जनतेला राजा मानतो, मी मतदाराला राजा मानतो. बोगस उद्योग करुन मत मिळवत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता विरोधकांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री असताना मी घरी होतो, अशी टीका माझ्याव केली जाते. होय, मी घरी बसून होतो, पण कुणाचे घर फोडले नाही, मी घरफोडी केली नाही, असे म्हणत उद्दव ठाकरेंनी भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
चंद्रशेखर बावनकुळे यांनीही केली टीका
भाजपाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. अमित शाह भाईंसोबत अडीच वर्षाची बोलणी झाली होती तर नरेंद्र मोदीजी, अमित भाई यांच्या प्रत्येक सभेत देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होणार हे सांगितलं जात होतं. तेव्हा तुम्ही तोंडातून चकार शब्द काढला नाही. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असे तुम्ही सांगायचे. पण हे पद तुम्ही स्वतःच बळकावले. सोबत लहान मुलाला मंत्री केलं आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी म्हणत सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं. त्याचवेळी तुमचा खोटारडेपणा महाराष्ट्रानं बघितला, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.