मुंबई - देशातील पहिले डिजिटल गाव असा लौकिक मिळवणाऱ्या हरिसाल गावातील एक व्हिडिओ दाखवत मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी हे गाव डिजिटल झाल्याचा दावा खोटा असल्याचं सोलापूर येथील सभेत दाखवून दिलं. मात्र, त्यांचा दावा हरिसाल येथील उपसरपंच गणेश येवले यांनी खोडून काढला आहे. राज ठाकरेंनी हरिसाल गावाविषयी दाखवलेला व्हिडिओ पूर्णपणे खोटा असून, त्यांनी हरिसालची संपूर्ण देशभरात बदनामी केल्याचं म्हटलं. त्यानंतर, मनसेनं खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांनी आमच्या गावाविषयी राजकारण करु नये, अशी विनंती त्यांनी केली. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर सांगोपांग चर्चा केली. आमच्या ‘डिजिटल व्हिलेज’ हरिसाल या गावात इंटरनेट व वायफायची सुविधा आहे. त्यामुळेच गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेत ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण दिले जात आहे. तर गावात महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. त्या बँकेचे एटीएम सर्व नागरिकांकडे आहे. गावातील काही नागरिक एटीएमचा वापर करतात. गावातील मोठ्या दुकांनदाराकडे पॉस मशिन उपलब्ध आहे. त्याचा सुद्धा वापर सुरू आहे. या सर्व सुविधा गावात उपलब्ध आहे. सुरवातीच्या काळात या सुविधा आमच्या गावात नव्हत्या. त्यावेळी कुणीही आले नाही. सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांनी आमच्या गावाच्या विकासाचे राजकारण करुन बदनामी करू नये, असे आवाहन त्यांनी केले. राज ठाकरे यांनी सभेत उभा केलेला मॉडेल तरुण आमच्या गावचा नागरिक नसल्याने त्यावर भाष्य करता येणार नाही, असेही ते म्हणाले.
उपसरपंच गणेश येवले यांच्या फेसबुक लाईव्हनंतर, मनसेचे नेते आणि डिजिटल गावची पोलखोल करणारे संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ''आता हरीसालच्या सरपंचाचा जबरदस्तीने फेस बुक लाईव्ह करा किंवा पंतप्रधानांच करा नाहीतर हरिसल मध्ये सोन्याची घर बांधा लोकांना पक्क समजलं आहे की तुम्ही फेकू आहात'', असे मनसेच्या देशपांडे यांनी म्हटलं आहे.