लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डेंग्यूपाठोपाठ जिल्ह्यात स्क्रब टायफसने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे निश्चित व संशयित असे २१ रुग्ण आढळल्याची माहिती आहे. दरम्यान, दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील एका सात वर्षीय मुलीला अमरावती येथे खासगी रुग्णालयात आणण्यात आले असून, प्राथमिक चाचणीत ती स्क्रब टायफस पॉझिटिव्ह आढळली. या रुग्ण मुलीची उपचारादरम्यान डेंग्यू चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर लक्षणावरून स्क्रब टायफसची चाचणी करण्यात आली. ती रॅपिड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर डॉक्ससायक्लिन व लोनोट्रोप्सने उपचार सुरू केले आहेत.स्क्रब टायफस विथ सेप्टिक शॉक असे अंतिम निदान स्थानिक खासगी रुग्णालयाने केले आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा हिवताप अधिकारी सुरेश तरोडेकर यांच्याशी संपर्क केला असता, ते पुण्यात असल्याने त्यांनी या माहितीला दुजोरा दिला नाही. रुक्मिणीनगर स्थित खासगी रुग्णालयाच्यावतीने त्या सात वर्षीय मुलीची स्क्रब टायफसची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. तिच्या पोटावर इशरचा व्रण दिसून आला आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. स्क्रब टायफसने बुधवारी मांगरुळी पेठ येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या आजाराच्या दहशतीत भर पडली आहे.श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये स्क्रब टायफसचे पाच रुग्णडॉ. मनोज निचत यांच्या राजापेठ स्थित श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये स्क्रब टायफसचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी दोघांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले, तर तिघांवर डॉ. निचत यांच्याकडे उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, पाचपैकी चौघांची इलाईझा चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एक रुग्ण संशयित आहे.
येवद्याच्या चिमुरडीला स्क्रब टायफस?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 1:16 AM