रोगमुक्ती, शरीर समृद्धीसाठी योग आवश्यकपालकमंत्री : विभागीय क्रीडा संकुलात उत्स्फूर्त प्रतिसादअमरावती : भारतीय परंपरेने विश्वाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे योग. आरोग्य संवर्धन, मन:शांती आणि सकारात्मकतेच्या वृध्दीसाठी योगाचे अमूल्य योगदान आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान्य होत आहे. त्यामुळेच पुरातन भारतीय संस्कृतीच्या या अनमोल ठेव्याला जगमान्यता प्रदान करण्याच्या हेतूने जगभर ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा करण्यात आला. शहरात शुक्रवारी रात्रीपासूनच सुरू असलेली पावसाची रिपरीप पहाटेपर्यंत सुरूच असल्याने योगदिनाच्या तयारीवर विरजण पडते की काय, अशी स्थिती होती. मात्र, भर पावसातही जिल्ह्यात ठिकठिकाणी योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी, आमदारांसह अनेक गणमान्यांनी योगासने केली. श्री हनुुमान व्यायाम प्रसारक मंडळात गृहराज्यमंत्री, महापालिका आयुक्तांनी योगासने केलीत. अमरावती : रोगमुक्ती व शरीर समृध्दीसाठी योग आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा खनिकर्म, उद्योग व पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. येथील विभागीय क्रीडा संकुलात शालेय शिक्षण विभाग, क्रीडा व युवक सेवा, जिल्हा क्रीडा परिषद, पतंजली योग, आर्ट आॅफ लिव्हिंगच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगदिवस आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, योग ही एक अंतर्गत शक्ती आहे. ही शक्ती ओळखून योगाचा सराव केल्यास सकारात्मक ऊर्जा बळावते. त्यामुळेच जगभरात योगाला मान्यता मिळाली आहे. यावेळी खा. आनंदराव अडसूळ, आ.रवी राणा, अतिरिक्त मुख्य सचिव, सुधीरकुमार गोयल, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) लखमी गौतम, जिल्हा शल्यचिकित्सक अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव, शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, शिक्षण उपसंचालक राम पवार, क्रीडा उपसंचालक जयपक्राश दुबळे, आर्ट आॅफ लिव्हिंगचे सदस्य, एनसीसी, महिला पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगदिनाचा उत्साह ओसंडून वाहात होता. पालकमंत्री, खासदार, आमदारांच्या उपस्थितीमुळे योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. यावेळी आर्ट आॅफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक नीरज अग्रवाल, श्रीकांत पाटील यांनी वृक्षासन, पादहस्तासन, ताडासन, त्रिकोणासन, भद्रासन, अर्धपुष्पासन, वक्रासन, मक्रासन, भूजंगासन, सेतूबंधासन, पवनमुक्तासन, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरीप्राणायम, विविध मुद्रा आदी योगासांचे प्रकार करुन घेतले. नीरज अग्रवाल यांनी योगदिनाच्या संकल्पनानिमित्त शपथ दिली.
योगमय अंबानगरी
By admin | Published: June 22, 2015 12:07 AM