पान १
अमरावती : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदत देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून ‘११२’ हेल्पलाईन क्रमांक लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. जीपीएस प्रणालीवर आधारित ही सेवा असेल. नवा क्रमांक सुरू झाल्यानंतर सध्याचा ‘१००’ हा क्रमांक बंद करण्यात येणार आहे. माहिती मिळाल्यानंतर अत्यल्प वेळात पोलिसांचे ११२ क्रमांकाचे वाहन घटनास्थळी पोहोचेल, असे नियोजन करण्यात येत आहे.
अमरावती शहर आयुक्तालयात नवा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्याची प्रक्रिया वेेगाने सुरू आहे.
नव्या ११२ क्रमांकामुळे एखाद्या नागरिकाने मदतीसाठी दूरध्वनी केल्यानंतर त्वरित मदत उपलब्ध होईल. पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी अर्थात रिस्पॉन्स टाईम आणखी कमी होईल. यापूर्वी नागरिक तक्रार करण्यासाठी पोलिसांच्या ‘१००’ क्रमांकावर संपर्क साधायचे. आता नागरिकांना ‘११२’ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे. महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईन सेवांसाठी ‘११२’ हाच हेल्पलाईन क्रमांक असेल. आधीच्या १००, १०१ व १०९२ या तीन टोल फ्री क्रमांकांचे एकत्रिकरण करून ११२ ही प्रक्रिया केंद्रिकृत केली जाणार आहे.
अशी जोडली जाईल प्रणाली
एखाद्या नागरिकाने ‘११२’ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तो दूरध्वनी मुंबई आणि नागपूर येथील कॉल सेंटरमध्ये जाईल. तेथील प्रतिनिधी तक्रारदाराबरोबर संवाद साधतील. ही बहुभाषिक सेवा असल्यामुळे तक्रारदाराला भाषिक अडचण येणार नाही. अमरावती शहर आयुक्तालय नागपूर मध्यवर्ती कॉल सेंटरशी जोडले जाईल. त्यात शहर आयुक्तालयातील नियंत्रण कक्ष, दहा पोलीस ठाणी, दामिनी पथके कनेक्ट राहतील.
अशी काम करणार यंत्रणा
घटनास्थळानजीकच्या परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या जीपीएस यंत्रणेवर, ११२ क्रमांकावर आलेल्या घटनेची, समस्येची, अडचणीची माहिती जाईल. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला कमीत कमी वेळेत मदत मिळेल. ‘११२’ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधणारी व्यक्ती कोठून बोलत आहे, त्या स्थानाबाबतची माहिती त्वरित उपलब्ध होईल. पोलिसांना प्रत्यक्ष घटनास्थळाची माहिती काही मिनिटांत उपलब्ध होईल.
कोट १
‘११२’ हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शहर पोलीस नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने शहर आयुक्तालयाला ११२ क्रमांक अंकित असलेली ११ बोलेरो वाहने देखील प्राप्त झाली आहेत.
- डॉ. आरती सिंह,
पोलीस आयुक्त, अमरावती