शेतकरी विवंचनेत : विवाह सोहळे थांबले; कर्जवसुलीसाठी तगादा, विविध समस्यांनी शेतकरी त्रस्तलोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तुरीची खरेदी अद्याप सुरूच असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. तूर विकून हाती पैसा आला नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. दुसरीकडे बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने घरातील अन्य महत्त्वाची कामे व पुढील हंगामाची तयारी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षी तूर डाळीचे भाव वधारल्याने तुरीचा पेरा वाढला होता. यामुळे तुरीचे उत्पादन अधिक झाले. दरम्यान एकाचवेळी बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढली. याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला. मोजमाप झाले नसल्याने तुरीच्या विक्रीतून पैसा मिळाला नाही. शेतकऱ्यांजवळची जमा पुंजी संपली. यामुळे शेतकऱ्यांसमोर मुला-मुलीच्या विवाहापासून तर शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला. अनेकांवर पैसा उपलब्ध होऊ न शकल्याने विवाह रद्द करण्याची वेळ आली आहे. नाफेडने केलेल्या तूर खरेदीचे पैसे अद्याप खात्यात जमा व्हायचे आहेत. दुसरीकडे कर्ज वसुलीचा तगादा बँकानी लावला आहे. पोलिसांची धमकी देत कर्ज वसुली केली जात आहे. घरातील कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी उसनवारी किंवा सावकाराकडून ३ ते ५ टक्क्यांवर कर्ज घेतले जात आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून कमी भावात माल खरेदी केले जात आहे. मध्ये स्वस्त दराने साडेतीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने तूर खरेदी करून हे व्यापारी नाफेडला जादा भावात विकत असल्याचे निदर्शनास येत आहे. पुढील हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बँकाकडे कर्जाची मागणी करीत आहेत. मात्र बँका त्यांना कर्ज नाकारत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी द्विधा मन:स्थतीत सापडला असून यावर्षी हजारो हेक्टर शेती पडीक राहण्याची अवस्था तालुक्यात निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासाठी शासनाने बराच कालावधी लावला. यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामाची तयारी करण्यासाठी वेळ मिळाला नाही. अद्याप तुरीचे पैसे मिळायचे आहेत तर बँका कर्ज देण्यास नकार देत आहेत. यामुळे आम्ही अडचणीत सापडलो आहोत- उद्धव फुटाने,शेतकरी, तिवसाघाटनाफेड व शासनाने खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे अद्याप देण्यात आले नाहीत. यामुळे शेतकरी पुढील हंगामाची तयारी करू शकला नाही. दुसरीकडे बँका कर्ज देत नसल्याचे चित्र आहे. तुरीचे चुकारे येत्या दहा दिवसांत द्यावे व बँकानी कर्जाची प्रक्रिया लवकर सुरू करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.- विक्रम ठाकरे,सभापती, पं.स. वरूडसातबाऱ्यावर खोडतोड; व्यापाऱ्यांतर्फे तूर विक्रीसचिवांची कारवाई : ६० पोते तूर रंगेहात पकडलीलोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : तालुक्यात सध्या शेतकऱ्यांच्या नावे नाफेडमध्ये तूर विक्री करण्याच्या घटना सर्रास सुरू आहेत. याबाबत बाजार समितीचे प्रहारचे संचालक मंगेश देशमुख यांनी अनेकदा तक्रारीसुद्धा केल्या आहेत. मात्र, शुक्रवारी दुपारी बाजार समितीचे सचिव मनीष भारंबे यांनी स्वत: नाफेडमध्ये व्यापाऱ्यांचाच माल विक्री होत असताना रंगेहात पकडले आहे. शासनाच्या नवीन आदेशानुसार २२ एप्रिल ते ९ मेपर्यंत बंद असलेली तूर खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली असल्याने १० मे पासून बाजार समितीत मोठ्या प्रमाणात तुरीची आवक सुरू झाली आहे. मागील चार दिवसांत बाजार समितीत सहा हजार पोत्यांवर आवक झाली. नेमका याच संधीचा फायदा काही व्यापाऱ्यांनी घेतला आहे. अशातच शिरजगाव कसबा येथील शेतकरी संजय कुंभारे यांच्या नावाचा सातबारा जोडून त्याच गावातील व्यापारी देवराव रावळे यांनी ६० पोते तूर नाफेडमध्ये विक्री करून मोजमाप सुरू केले. टोकन क्रमांक २८०६५ वरील तुरीचे मोजमाप सुरू असताना बाजार समितीचे सचिव मनीष भारंबे यांना शेतकरी व मालावर शंका आल्याने त्यांनी चौकशी केली. चौकशीदरम्यान ज्या नावाने तूर आणली होती, तो शेतकरी हजर नव्हता. इतकेच नव्हे,तर सातबाऱ्यावर कपाशी व तुरीचा पेरा दाखविला असताना त्यात खोडतोड करून १ हेक्टर ५० आर कपाशी व १ हेक्टर ६० आर तुरीचा पेरा रोखून तूर जप्त करून पंचनामा केला. सदर प्रकरणाची माहिती उपविभागीय अधिकारी व सहायक निबंधक यांना देण्यात आली आहे. या प्रकारामुळे बाजार समितीत नाफेडमध्ये व्यापाऱ्यांची तूर विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. व्यापाऱ्यांवर अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नसून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतरच कारवाईची पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती सचिव मनीष भारंबे यांनी दिली.
तुरीचे चुकारे अन् बँकेचे कर्जही मिळेना!
By admin | Published: May 16, 2017 12:15 AM