अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज यांची ‘जगदंब’ तलवार आणि वाघ नख लंडनहून परत आणण्याच्या हालचालींना दोन्ही देशांच्या स्तरावर वेग आला आहे. त्याअनुषंगाने ब्रिटनचे डेप्युटी चीफ कमिशनर यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, ‘तुम्ही ‘जगदंब’ आणि अफझल खानाचा कोथळा बाहेर काढणारे वाघ नख द्या, आम्ही दोन जिवंत वाघ देऊ’ , असे राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रिटनच्या अधिकाऱ्यांना मिश्कीलपणे सांगितले.
मंत्री सुधीर मुनगंटीवार शनिवारी गुरुकुंज मोझरी येथे आश्रमात भेटीसाठी आले असता त्यांनी‘लोकमत’शी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व विधीची सुरुवात आई भवानीचे दर्शन घेऊन सोन्याचे छत्र अर्पण केले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या युद्धात सोन्याची लुटालूट झाली. आता आम्ही निर्णय घेतला असून, शास्त्रानुसार राज्याभिषेकाच्या सोहळ्यापूर्वी प्रतापगडाचे महत्त्व अधिक आहे. तसेच शिवभक्तांच्या मागणीनुसार सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून प्रतापगडावर तीन किलो वजनाचे चांदीचे छत्र अर्पण केले आहे. यंदा शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्यभिषेक सोहळा हा वर्षभर साजरा केला जाणार आहे.
३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या अनुषंगाने ब्रिटनकडे असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंब तलवार आणि वाघ नख परत आणले जाणार आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाचे एक शिष्टमंडळ ब्रिटन येथे जाणार आहे.