अमरावती : एका विवाहितेला कमनशिबी, भिकारी संबोधून तिचा अनन्वित छळ करण्यात आला. १२ ऑगस्ट २०१३ ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ही घटना घडल्याची तक्रार विवाहितेने चांदूर रेल्वे पोलिसांत नोंदविली आहे.
पीडिताचे लग्न झाल्यानंतर तिला ८ ते १० महिने चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर विवाहितेला मुलगी झाल्याने छळाला सुरुवात झाली. ती नवजात मुलगी पती व सासरच्या मंडळीला नकोशी होती. त्यानंतर सासरकडून आम्हाला मुलगाच पाहिजे होता, असे म्हणून तिची हेटाळणी करण्यात आली. हा छळ एवढ्यावरच न थांबता तू कमनशिबी, गरिबाची आहेस, तुझे खानदान भिकारी आहे, तुम्ही लग्नात हुंडा दिला नाही, या कारणावरून तिच्या पतीला अन्य आरोपींनी तिला मारहाण करण्यास प्रवृत्त केले. सर्व आरोपींनी संगनमत करून आपल्याला शारीरिक त्रास दिला. शिवीगाळ करून मानसिक छळ केला. संबंधित प्रकरण भरोसा सेलकडे पाठविण्यात आले होते. मात्र, तेथे समेट घडवून न आल्याने चांदूर रेल्वे पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित ३२ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पती मनोज वसंतराव बोबडे, सासरे वसंतराव बोबडे, विनोद भोयर व दोन महिला (सर्व रा. बालाजी वाॅर्ड, चांदूर रेल्वे) यांच्या विरुद्ध कलम ४९८ अ, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.