अमरवाती - विद्यापीठ परिसरातील एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोपींना फ्रेजरपुरा पोलिसांनी गस्तीदरम्यान अटक केली. शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दोघे जण घटनास्थळाहून पळून जाण्यात यशस्वी ठरले.
प्रकाश दिगंबर गवळी (२८), गजाननन हरिभाऊ उके (३०, दोघेही रा. वडाळी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल २५ टॉमी, दोन दुचाकी असा ऐवज जप्त करण्यात आला. फ्रेजरपुराचे बीट मार्शल रामदास गोंधळे व सुरेंद्र पवार हे दोघे परिसरात रात्रकालीन गस्त घालत असताना चार आरोपी विद्यापीठाच्या भिंतीजवळ दरोडा टाकण्याच्या बेतात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विद्यापीठाजवळील एका एटीएमजवळ उभे असताना त्यांना हटकण्यात आले. या घटनेची माहिती पीआय पुंडलिक मेश्राम यांना दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर ठाणेदारांनी चौघांपैकी दोघांना अटक केली. विजय हरिभाऊ उके (रा. वडाळी) व अजय भोसले (रा. राजुरा) हे पळून गेले. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी कलम ३९९, ४०२ अन्वये गुन्हा दाखल केला.