इको-फ्रेंडली होण्याचा संदेश, पर्यावरणाचा समतोल राखण्याचा बोध देते मूर्ती
फोटो - राऊत ११ ओ
धामणगाव रेल्वे : दोन किलो रद्दी, टिश्यू पेपर, गोंद असे साहित्य घेऊन सात दिवसात एका युवकाने विदर्भातील शक्तिपीठ असणाऱ्या वणी येथील माता सप्तशृंगी यांची कागदापासून घरीच मूर्ती तयार केली आहे. गणेशोत्सव काळात ही मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
स्थानिक धामणगाव शहरातील हिरापूर रोडवर कोठारीनगर येथे अभिजित घाटे हा युवक राहतो. वडील प्रमोद घाटे अंजनसिंगी येथील भारतीय स्टेट बँकेत रोखपाल, तर आई गृहिणी आहे. अभिजितचे शिक्षण बीए झाले आहे. धाकटा भाऊ संकेत हा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी चार वर्षांपासून अभिजितने स्वतःचा रेडिमेड कापड व्यवसाय सुरू केला आहे. दिवसभर दुकानात काम करून मिळालेल्या फावल्या वेळेत यू-ट्यूबवर निरीक्षण करून कागदापासून अनेक मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण त्याने स्वतः घेतले.
गतवर्षी अभिजितने कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा मुखवटा तयार केला होता. नुकतेच श्रीगणेशाचे आगमन झाले आहे. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी वेगवेगळी सज्जा व सजावट पाहायला मिळत आहे. कोरोनाकाळ असल्याने घरीच हा उत्सव साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे अभिजितने आपल्या घरीच माता सप्तश्रुंगीची मूर्ती तयार केली. इको-फ्रेंडली होण्याचा संदेश व पर्यावरणाचा समतोल राखण्याचा बोध या कलाकृतीतून होत असल्याचे मत अभिजित घाटे याने व्यक्त केले.