--------------
कसाबपुरा येथून गोमांस जप्त
चांदूर बाजार : येथील कसाबपुरा भागातून १८ हजार रुपये किमतीचे गोमांस जप्त करण्यात आले. १५ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी कारवाई केली. आरोपी शेख अयाज शेख महबूब (२६, कसाबपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
----------------------
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
धारणी : चिखलदरा तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळविण्यात आले. १० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता ती कुणालाही न सांगता घरून निघून गेली. अशी तक्रार १६ एप्रिल रोजी धारणी पोलिसांत करण्यात आली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी आरोपी अजय बेलसरे (रा. आढाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------
तोरणवाडीत अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू
चिखलदरा : तालुक्यातील तोरणवाडी येथे दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात गणेश छोटूसिंह चव्हाण (रा. कोटमी) याचा मृत्यू झाला. एमएच २७ बीपी ७३०७ क्रमांकाच्या दुचाकीने तोरणवाडीहून कोटमी गावाकडे जात असताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी मृताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
----------------
पांढरी खानमपूर येथून गाय लंपास
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील शमशेरखाँ यांच्या मालकीच्या गाय लंपास करण्यात आली. १६ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------
फुबगाव येथे तीन ठिकाणी चोरी
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील फुबगाव येथील अनिसखाँ यांच्या घरातून ६० हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला, तर तेथीलच लीलेश्वर मते यांच्या घरातून १० हजार रुपये व संजय ठोंबरे यांच्या घरातून २३ हजार रुपये रोख लांबविण्यात आली. १६ एप्रिल रोजी रात्री या तीनही घटना घडल्या. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------
सरपंच ढाण्यात पाणीटंचाई
चिखलदरा : मेळघाटातील सर्वांत अतिदुर्गम म्हणून हतरूची ओळख आहे. तेथील सरपंच ढाण्यात गतवर्षी विहिरीचे खोदकाम करण्यात आले. त्या विहिरीतून सरपंच ढाण्यातील आदिवासींना पाणी काढण्यासाठी रांग लावावी लागत असल्याचे चित्र आहे. नळ योजनचा प्रस्ताव ठक्कर बाप्पा योजनेतून दाखल करण्यात आला असला तरी प्रशासकीय पातळीवर तो गुंडाळून ठेवण्यात आला.
-----------
अंजनगावातील पथदिव्यांचे करायचे तरी कसे?
अंजनगाव सुर्जी : शहरातील मुख्य रस्त्यावरील पूर्वीचे सीएफएल दिवे काढून त्या जागेवर नवीन एलएडी दिवे लावण्याचे आदेश राज्यातील सर्व नगर परिषदांना देण्यात आले होते. त्यानुसार ईईसीएल या कंपनीने अंजनगाव शहरात एलएडी पथदिवे लावले. मात्र, सध्या ते दिवसा सुरू अन् रात्री बंद अशी अवस्था आहे.
----------------
परतवाड्यातील रस्ते अतिक्रमणात
परतवाडा : शहरातील रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद बनले आहेत. जड वाहतूक, बेदरकार ट्रक, क्रेन, जेसीबीमुळे शहरातील नागरिक अपघाताच्या भीतीने कमालीचे दहशतीखाली आले आहेत. दुसरीकडे सर्वत्र अतिक्रमण झाल्याने रस्त्यांचा जीव गुदमरत असल्याचे चित्र आहे.
----------------
समाधाननगरच्या कोपऱ्यावर कचराच कचरा
अमरावती : इर्विनशेजारच्या समाधाननगरचा कोपरा कचऱ्याचे आगार बनले आहे. नगरसेवकांसह स्वास्थ्य निरीक्षकांचे दुर्लक्ष त्यासाठी कारणीभूत असल्याची स्थानिकांची ओरड आहे. या भागात कचरा संकलनासाठी वाहन येत नसल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.
-------------------
पंचवटीच्या उड्डाणपुलाखाली सकाळी हातगाड्या
अमरावती : पंचवटी भागातील उड्डाणपुलाखाली पुन्हा एकदा भाजीपाला, नाष्टा व अन्य खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लागत आहेत. मात्र, हातगाडीचालक तेथेच कचरा टाकत असल्याने त्या परिसरात कचरा व घाण पसरली आहे. महापालिकेने या अतिक्रमणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष चालविले आहे.
------------------
कोरोना नियंत्रण पथके बेपत्ता
दर्यापूर : शहर व तालुक्यात महसूल व नगरपालिकेची पथके बेपत्ता झाली आहेत. ग्रामीण भागात २०० ते ३०० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न होत असताना कुठलीही कारवाई केली जात नाही. कोरोनाची स्थिती नेमेचि येतो पावसाळा अशी झाली आहे. कुणीही त्याबाबत फारसे सजग नाही.
-------------------
अंजनगावच्या आठवडी बाजारात अस्वच्छता
अंजनगाव बारी : स्वच्छता व स्वयंशिस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे येथील बाजार परिसरात सगळीकडे अस्वच्छता पसरली आहे. परिणामी, बाजार परिसरात दुर्गंधी व अस्वच्छतेने थैमान घातले. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
---------------