अमरावती : मारहाणीमुळे गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान दगावलेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी वलगाव पोलिसांनी २९ नोव्हेंबर रोजी रात्री खुनाचा गुन्हा दाखल केला. शेखर राजेंद्र तायडे (२८, शिराळा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. अंकुश प्रल्हाद सोनवणे (३०, शिराळा) असे मृताचे नाव आहे.
३० नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास अंकुशला आरोपी शेखर तायडे याने काठीने मारले. शिराळा येथे घडलेल्या त्या प्रकाराची वाच्यता केल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान २ डिसेंबर रोजी पीडीएमसी येथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपल्या मुलाचे एका महिलेसोबत संबंध होते. त्यातून आरोपी शेखरने त्याला मारले. त्यामुळे आपला मुलगा उपचारादरम्यान दगावला, अशी तक्रार अंकुशच्या पालकाने नोंदविली. अंत्यसंस्कारावेळी देखील अंकुशला शेखर तायडे यानेच मारल्याची चर्चा होती.
इर्विनमध्ये असताना अंकुशने आपल्याला शेखर तायडे यानेच मारहाण केल्याची माहिती दिली होती. मात्र, मुलाचे मृत्युचे दु:ख व आरोपीच्या दहशतीमुळे आपण तक्रार देण्यास उशिर लावल्याचे अंकुशच्या पालकाने वलगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली होती. मात्र, चौकशी, पीएम रिपोर्ट व बयानाच्या आधारे यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती वलगावचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी दिली.