लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने विमनस्क झालेल्या एका २६ वर्षीय तरुणीने विष घेऊन आत्महत्या केली. २३ जुलै रोजी तिचा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यावर धडक दिली. तत्पूर्वी, मृताचे कुटुंबीय व फ्रेजरपुऱ्यातील स्थानिकांनी आयुक्त कार्यालयात जाऊन आरोपीच्या अटकेची मागणी बुलंद केली होती. या जनाक्रोशानंतर शनिवारी दुपारी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून कुणाल प्रल्हाद मेश्राम (३५, रा. फ्रेजरपुरा) व एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, मुले नोकरीनिमित्त घराबाहेर असताना वडील मुलीसह घरी होते. १९ जुलै रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास मुलगी तिच्या खोलीमधून विषाचा घोट घेऊन बाहेर आली. तिने वडिलांकडे आपबीती कथन केली. कुणाल मेश्रामशी चार वर्षापासून प्रेमसंबंध होते. तो आता लग्न करण्यास नकार व धमकी देत असल्याने विष घेतल्याचे तिने वडिलांना सांगितले. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, उपचारादरम्यान तिचा २३ जुलै रोजी रात्री मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुलीचे शोषण झाल्याचा आरोपही तक्रारीतून करण्यात आला.
दोन दिवस तक्रारच घेतली नसल्याचा आरोप मृत मुलीच्या मामाने कथन केल्यानुसार, २० व २१ जुलै रोजीदेखील फ्रेजरपुरा पोलिसांनी तक्रारच नोंदवून घेतली नाही. मुलीचे बयाण नसल्याचे कारण सांगण्यात आले. २२ जुलै रोजी पुन्हा ठाण्यात आल्यानंतर चौकशीस सुरुवात केल्याचे ठाणेदारांकडून सांगण्यात आले. त्याच दिवशी घटनास्थळाहून विषाची बॉटल व पेला जप्त करण्यात आल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.
नोकरीनंतरही नकार : एका ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना आरोपी कुणालशी ओळख झाली. त्याने प्रेमजाळ्यात ओढले. लग्न करण्याची बतावणीदेखील केली. त्याला रेल्वेत अकोला येथे नोकरी लागली. यानंतर त्याने दिलेला नकार, त्याच्या कुटुंबाकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या मामाने केला.
काय म्हणाले ठाणेदार?२१ जुलै रोजी मृत मुलीचे वडील आपल्याकडे तक्रार घेऊन आले. आरोपीविरुद्ध शोषणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, तसा गुन्हा दाखल करण्यासाठी पीडिताचा जबाब आवश्यक असतो. ती मुलगी त्यावेळी बेशुद्धावस्थेत होती. यामुळे बयाण घेणे शक्य झाले नाही. त्यानंतर लगेचच पोलिसांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. विषाची बॉटल व पेला जप्त केला. एखादा व्यक्ती मरण्यापूर्वी एखाद्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा वा अन्य गुन्हा दाखल करणे कायदेसंगत नसल्याची प्रतिक्रिया फ्रेजरपुरा येथील ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी ‘लोकमत’कडे दिली.