अमरावती : आपल्या नावे इराणला जाणारे पार्सल पकडण्यात आले असून, त्यात आक्षेपार्ह वस्तू असल्याची बतावणी करण्यात आली. त्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी येथील एकाची चक्क ११ लाख २५ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ४ जून रोजी सकाळी ८.११ ते दुपारी पाच या कालावधीत ती फसवणूक करण्यात आली. आदित्य सुनिलराव ढोले (२४, रा. महालक्ष्मीनगर) याच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी ८ जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास एका मोबाईल युजरविरूध्द फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला.
४ जून रोजी फिर्यादी आदित्य ढोले याला एका अनोळखी मोबाईल धारकाने कॉल करुन आपण फेडेक्स, मुंबई या कुरिअर कंपनीच्या अंधेरी शाखेमधून बोलत असल्याची बतावणी केली. आपल्या नावाने पाठविले ईराणला जाणारे पार्सल पकडण्यात आले असून, त्यात काही आक्षेपार्ह वस्तु असल्याची बतावणी करण्यात आली. आदित्यला त्याच्या नावाचे पार्सल देखील व्हिडीओ कॉल करून दाखविण्यात आले. हे प्रकरण कस्टम वा पोलिसांत गेल्यास अटक होण्याची भीती दाखविण्यात आली. या प्रकरणातून बाहेर काढण्याची हमी पलिकडून देण्यात आली. मात्र त्यासाठी काही रक्कम खर्च करावी लागेल, असे पलिकडून सांगण्यात आले.
आरोपीने घेतला आदित्यच्या मोबाईलचा ताबा
आरोपी मोबाईल युजरने स्कायपी या ॲपच्या माध्यमातून आदित्य ढोले याच्या मोबाईलला ताबा घेतला. आरोपीने चक्क आदित्यच्या नावे पर्सनल लोन मंजूर करुन घेतले. ते त्यालाच आरोपीच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. आपण फसविला गेलो, याची पुरती जाणीव होण्यापुर्वीच आरोपीने आदित्यची सुमारे ११ लाख २५ हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक केली. आदित्यने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. काही दिवसांपुर्वी साईनगर येथील एका तरूणीची देखील याच पध्दतीने फसवणूक करण्यात आली होती. हे विशेष.