अमरावती : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतून एका १५ वर्षीय मुलीला फूस लावून पळविणा-या तरुणाला पनवेल पोलिसांनी पकडले. गाडगेनगर पोलिसांनी आरोपीला पनवेलहून ताब्यात घेतले असून त्याला मंगळवारी अमरावतीत आणले. रोशन निरंजन चराटे (२२,रा.विलासनगर) असे आरोपीचे नाव आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी २२ नोव्हेंबर रोजी अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता. विलासनगरातीलच रोशन चराटेवर मुलीच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. प्रेमप्रकरणातून आरोपीने मुलीला पळवून नेल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. आरोपीच्या मोबाईल क्रमाकांच्या आधारे पोलिसांनी लोकेशन घेतले असता तो तरुण सर्वप्रथम नागपूरला असल्याचे आढळून आले. त्यानंतर ते भुसावळ रेल्वे स्टेशनवर असल्याचे समजले. त्यानुसार अमरावती पोलिसांनी भुसावळ पोलिसांची मदत घेतली. मात्र, शोध घेण्यापूर्वीच ते तेथून निघून गेले. दोघेही मुंबईतील पनवेल स्टेशनवर चार तास बसून होते. ही बाब पनवेल पोलिसांना माहिती होताच तेथील पोलीस निरीक्षक विश्वकार व पोलीस उपनिरीक्षक बाबर यांनी आरोपीसह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. माहिती मिळताच गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक पनवेलला रवाना झाले आणि दोघांनाही ताब्यात घेतले.
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणा-या तरुणाला पनवेलमध्ये अटक, अमरावती पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 6:45 PM