अमरावती : आॅनलाईन पोलीस भरतीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य नसताना ते प्राप्त करण्यासाठी हजारो युवक-युवतींनी येथील जिल्हा सामान्य रूग्णालय (इर्विन)गाठले. मात्र, एकाच वेळी हजारो तरूण वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी आल्याने इर्विनची यंत्रणा ढासळली. दरम्यान दलालांनी चिरीमिरी घेऊन या अर्जदारांची फसवणूक चालविल्याने प्रचंड गोंधळ उडाला. अखेर आ. सुनील देशमुख यांच्या मध्यस्थीने या प्रकरणावर गुरुवारी पडदा पडला.गृह विभागाने राज्यभरात चार हजार पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया राबविली आहे. या भरतीसाठी गुरुवारी १८ फेब्रुवारी ही आॅनलाईन अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख होती. आॅनलाईन अर्जासोबत कागदपत्रे ेपाठविताना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य असल्याची अफवा हेतुपुरस्सर पसरविली गेली. त्यामुळे पोलीस भरतीच्या अर्जदार तरूणांनी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘मेडिकल सर्टिफिकेट’ मिळविण्यासाठी मोठी गर्दी केली होती. १२०० ते १४०० अर्जदार वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्यासाठी इर्विनमध्ये पोहोचताच आरोग्य यंत्रणेची दमछाक उडाली. एकाचवेळी हजारो अर्जदारांना वैद्यकीय प्रमाणपत्र देणे अशक्य असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातून काढता पाय घेतला.ही तर प्रशासनाची पोलखोल- आ. देशमुख४पोलीस भरतीबाबत जिल्हा प्रशसन सजग नसल्याबद्दल आ. सुनील देशमुख यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. इर्विन रुग्णालयात हजारो अर्जदार वैद्यकीय प्रमाणपत्रसाठी दाखल झाले असताना त्यांची समस्या सोडविण्याऐवजी डॉक्टरांनी पळ काढावा, ही शरमेची बाब असल्याचे आ. देशमुख म्हणाले. हजारोंच्या संख्येने जमलेल्या युवक, युवतींचे प्रश्न सुटले नसते तर त्यांनी आक्रमक पावित्रा उचलला असता. त्यामुळे इर्विनमध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली असती, असे भाकीत आ. देशमुखांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
‘इर्विन’मध्ये युवकांचा गोंधळ
By admin | Published: February 19, 2016 12:32 AM