युवक काँग्रेसचा एल्गार ! डिजिटल व्हिलेजची जाहिरात खरी करून दाखवा, निषेधार्थ सरकारची काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 07:30 PM2017-11-25T19:30:34+5:302017-11-25T19:33:01+5:30
देशातील पहिले डिजिटल व्हिलेज हरिसालची राज्य सरकार जाहिरात करीत आहे. ही जाहिरात खोटी असून येथे अद्याप सुविधा नाहीत. जाहिरातीत दाखविण्यात येणा-या सर्व सोयी-सुविधा ख-या करून दाखवा, असे सांगत युवक काँग्रेसने हरिसाल येथे निषेधार्थ एक दिवसीय उपोषण आंदोलन केले.
अमरावती (हरिसाल) : देशातील पहिले डिजिटल व्हिलेज हरिसालची राज्य सरकार जाहिरात करीत आहे. ही जाहिरात खोटी असून येथे अद्याप सुविधा नाहीत. जाहिरातीत दाखविण्यात येणा-या सर्व सोयी-सुविधा ख-या करून दाखवा, असे सांगत युवक काँग्रेसने हरिसाल येथे निषेधार्थ एक दिवसीय उपोषण आंदोलन केले.
हरिसालची जाहिरात फसवी असल्याचे उघड होताच सरकारने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. अधिकाºयांनी भेटी दिल्यात. सर्वकाही ऑलवेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी विरोधी पक्षांनी दौरा केल्यावर सरकारची जाहिरात फसवी असल्याचे सबळ पुरावे मिळाले. सरकारला त्यांचे अपयश दाखविण्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने ‘आँखे खोलो’ एक दिवसीय उपोषण करण्यात आले.
सरकारी जाहिरातीतील सर्व माहिती तत्काळ अंमलात आणावी अन्यथा येथे प्रस्तापित केलेली सर्व कार्यालये जाळू, असा इशारा जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव राहुल येवले यांनी दिला. यावेळी राज्य शासनाचा प्रतिकात्मक मृतदेह तिरडीवर ठेवून त्याचेसमोर ‘मी लाभार्थी’ लिहिलेले फलक कार्यकर्त्यांनी हाती घेतले. डिजिटल व्हिलेजच्या कार्यालयापर्यंत शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. आंदोलनात मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे, जि.प. सदस्य महेंद्रसिंह गैलवार, मिश्रीलाल झाडखंडे, राजा पाटील, श्रीपाल पाल, दयाराम काळे, शेख मुखत्यार, शैलेश म्हाला, रोहित पाल यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्ताधा-यांनी सर्वसामान्यांच्या गरजा हिरावून घेतल्या आहेत. जनतगेला वेठीस धरून फसवणूक केली जात आहे. हे फडणवीस नव्हे, ‘फसणवीस’ सरकार आहे. - केवलराम काळे, माजी आमदार, मेळघाट विधानसभा मतदारसंघ.
केवळ प्रसिद्धीसाठी खोट्या जाहिरात केल्या जात आहेत. जे सत्य आहे ते समोर यावे, हरिसालच्या नागरिकांना सोयी मिळाव्या. - महेंद्रसिंग गैलवार, जि. प. सदस्य, हरिसाल क्षेत्र