अमरावती: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील केंद्र सरकारच्या योजनेच्या जाहिरातीवर खासगी असा उल्लेख असल्याने सोमवारी स्थानिक युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भारत असे स्टीकर चिकटवून सरकारचा निषेध केला. त्यामुळे केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजना या केंद्र सरकारच्या योजना आहेत, कोणत्याही व्यक्तीच्या नाहीत. परंतु, सर्वसामान्यांच्या पैशातून स्वत:चा प्रचार करत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने आंदोलन केले.
केंद्र सरकारच्या सर्व जाहिराती जनतेच्या पैशातून होतात. त्या जाहिरातींमध्ये देशभर सर्वत्र ‘भारत सरकार’ असे अपेक्षित आहे. मात्र, खासगी नावे छापण्यात आली असून, ही संविधान विरोधी कृती असल्याचे युवक काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने प्रत्येक योजनेच्या बॅनरवर भारत सरकार असे नाव करावे, अशी मागणी युवक काँग्रेसने वारंवार करूनही केंद्र सरकारने याची दखल घेतली नाही. त्यामुळे नागपूर येथे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी बॅनरवर भारत सरकार असे स्टीकर चिकटवून काळे फासून आंदोलन केल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या निषेधार्थ अमरावतीतही युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षण भिंतीवर लावण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या योजनेसंदर्भातील बॅनरवरील भारत असे स्टीकर चिकटवत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी नीलेश गुहे, वैभव देशमुख, पंकज मांदळे, शुभम बांबल, अभिजित मेश्राम, अमय देशमुख, अमित गुडधे, वेदांत साखरे, अमोल राऊत, आदी या आंदोलनात सहभागी होते.