लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : नाफेडद्वारे होत असलेली तूर खरेदी बंद केली. ज्या शेतकऱ्यांना टोकन दिले आहे त्यांची तूर अद्याप खरेदी केलेली नाही. आता मार्केट यार्ड रिकामे झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरी असलेली व टोकन दिलेली तूर खरेदी करावी, अशी मागणी करीत दर्यापूर बाजार समितीमध्ये युवक काँग्रेसने ‘तूर घ्या तूर’ आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्याच्या दु:खांवर फुंकर नव्हे, तर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असा आरोप करण्यात आला. दर्यापूर बाजार समितीत शासनाने नाफेडच्या माध्यमातून ३० मेपर्यंत तूर खरेदी केली. परंतु मार्केट यार्डात जागा नसल्याने शेतकऱ्यांना आपली तूर घरीच ठेवून टोकन घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले. आता मार्केट यार्ड रिकामे झाले असताना त्या तुरीची खरेदी सुरू करण्याची मागणी युकाने केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा देण्यात आला. मागण्यांचे निवेदन यावेळी देताना यु.काँ.चे सागर देशमुख, हरीभाऊ गाळकर, शिवाजी देशमुख, नावेद, गणेश लाखे, मंगेश पांडे, निवृत्ती पचारे, मंगेश आवठे, संजय देशमुख आदी उपस्थित होते.
युवक काँग्रेसचे ‘तूर घ्या तूर’ आंदोलन
By admin | Published: June 25, 2017 12:05 AM