अमरावती : वलगाव नजिकच्या रामा येथे जुन्या वैमनस्यातून ४० वर्षीय युवकाचा डोक्यावर सब्बलने प्रहार करून खून करण्यात आला. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. रामकृष्ण नामदेवराव निंघोट (वय ४०) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी आरोपी रामदास परसरामजी सरोदे (६५) याला वलगाव पोलिसांनी अटक केली. रामकृष्ण निंघोट यांच्याशी रामदासने घराचाकूड घालण्याच्या कारणावरून वाद घातला. एकमेकांच्या शेजारी राहत असल्याने त्यांच्यात जुना वाद होता. रविवारी सकाळी त्यांच्यातील वाद उफाळून आला. रामकृष्ण निंघोट हे घरासमोर दुचाकीवर असताना रामदास हा त्यांच्या मागून आला. त्याने त्यांच्या मानेवर, डोक्यावर सब्बलने वार केले.
रामकृष्ण हे घटनास्थळीच कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मृताची पत्नीदेखील जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वलगावचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रक्तबंबाळ स्थितीत असलेल्या रामकृष्ण निंघोट यांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले. तपासणीअंती डॉक्टरांनी रामकृष्ण यांना मृत घोषित केले. मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा होता वाद
रामकृष्ण निंघोट आणि रामदास सरोदे यांचे गावात समोरासमोर घर आहे. रामदास सरोदे घरासमोर कुळ घालत असून तो त्याची सीमा सोडून समोर कुळ घालतो, त्यामुळे आम्हाला अडचण होते, असे निंघोट यांचे म्हणने होते. याच कारणावरुन यापुर्वीही निंघोट आणि सरोदे यांच्यात किरकोळ वाद झाले होते. दरम्यान रविवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास रामकृष्ण निंघोट दुचाकी घेवून बाहेर निघाले होते, ते घरासमोर दुचाकीवर बसलेच होते, आता दुचाकीने जाणार, त्याचवेळी मागून येवून रामदास सरोदेने लोखंडी सब्बल घेवून थेट निंघोट यांच्या डोक्यात व मानेकर सब्बलाचे वार केले.