अब्बासपुऱ्यातील घटना : दोन आरोपींना अटक अचलपूर/परतवाडा : अवैध दारूविक्रेत्याने एका युवकावर धारदार चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना बुधवारी जगदंबा देवी चौकातील अब्बासपुरा परिसरात दुपारी ३ वाजता घडली. अमोल गजानन फिस्के (३५) व आदित्य रमेश शेंदरे अशी आरोपींची तर अमोल मोहन रक्ताळे (२०) असे मृताचे नाव आहे. अब्बासपुऱ्यातील रहिवासी आरोपी अमोल फिस्के हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो अवैध दारूविक्रीचा व्यवसाय करतो. मागील अनेक दिवसांपासून त्याचा हा व्यवसाय सुरू असून त्याच्यावर सरमसपुरा ठाण्यांतर्गत गुन्हेही दाखल आहेत. बुधवारी अमोल रक्ताळे काही कामानिमित्त बाहेर जात असताना अमोल फिस्के याचा भाचा आदित्य रमेश शेंदरे याने त्याला घरात बोलावले व तेथे अमोल फिस्के आणि रमेश शेंदरे यांनी त्याच्याशी त्याचा वाद घातला याच वादात अमोल फिस्के याने अमोल रक्ताळेवर चाकूने सपासप वार केलेत.पोलिसांचा तगडा बंदोबस्तअचलपूर/परतवाडा : गंभीर जखमी अवस्थेत अमोल रक्ताळे याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच सरमसपुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आरोपी अमोल फिस्के याला व आदित्य शेंदरे याला हत्यारासह ताब्यात घेतले. मृत अमोल रक्ताळे याचे वडील मोहन रक्ताळे यांच्या तक्रारीवरून सरमसपुरा ठाण्याचे ठाणेदार अभिजित अहिरराव यांनी दोन्ही आरोेपींविरूद्ध भादंविच्या कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. दीड ते दोन महिन्यांपूर्वी आरोेपी अमोल फिस्के याची अवैध दारू पोलिसांनी पकडली होती. हे रक्ताळेचेच कारस्थान असल्याचा अमोल फिस्के याला संशय होता. यापूर्वीही अमोल रक्ताळेला अमोल फिस्के याने जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. तशी तक्रारही अमोल रक्ताळे याने पोलिसांत नोंदविली होती. याच वादातून त्याची हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे.
अचलपुरात युवकाची हत्या
By admin | Published: February 02, 2017 12:03 AM