अमरावती : भारताच्या संस्कृतीची विश्वात ओळख आहे. शिक्षणातून प्रगती साधता येते. मात्र, आपल्याला जे काही मिळाले आहे, ते समाजाचं आहे. त्यामुळे प्रगती साधताना समाजाचं ऋण फेडा आणि देशाचं देणं व्हा, असा मोलाचा संदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी दिला.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३८ व्या दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ऑनलाईन उपस्थित असताना ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी मंचावर मुख्य अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीउदय सामंत हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, परीक्षा व मू्ल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी, प्रफुल्ल गवई, वसंत घुईखेडकर, प्राचार्य नीलेश गावंडे, वित्त व लेखाविभागाचे डॉ. नितीन कोळी, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, विद्यार्थ्यांनो आई-वडिलांची सेवा हाच खरा धर्म आहे. पण, देशाचा सन्मान करणे हे आद्य कर्तव्य आहे. आपली प्राचीन संस्कृती जोपासताना ध्येय निश्चित गाठा. तेव्हाच तुम्ही घेतलेले शिक्षण, पदवीचे सार्थक होईल. समस्या कोणतेही येऊ द्या, त्याचा सामना करणे शिका, असे ते म्हणाले. शिक्षणासोबत रोजगाराचे साधन उपलब्ध करा. आत्मनिर्भर होण्यासाठी पुढाकार घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. नव्या भारताच्या प्रगतीचे वाटेकरी होताना तरुणाईने समाजाचं ऋण फेडावं, असे राज्यपाल यांनी सांगितले.
आदर्श 'पुष्पा' नव्हे, छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज असावे - उदय सामंत
चित्रपट अथवा टीव्ही बघून तरुणाई आदर्श बाळगायला लागली आहे. मै झुकेंगा नही.. असे म्हणत पुष्पा फीवरचे वेड अनेकांना लागले आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज हे मुगलांसमोर झुकले नाही. छत्रपती संभाजी राजे हे औरंगजेबापुढे झुकले नाही. हा आपला खरा इतिहास आहे. त्यामुळे तरुणाईने आपले आदर्श शिवाजी महाराज, संभाजी राजे यांना ठेवावे आणि प्रगती साधावी, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी येथे केले.