चांदूर रेल्वे : कोरोनाग्रस्तांना वरदान ठरणारे प्लाझ्मा दान करण्यासाठी चांदूर रेल्वे तालुक्यातील दात्यांची यादी गोळा करण्यासाठी युवकांनी छत्रपती रक्तदान सेवा या माध्यमातून धडपड सुरू केली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दान करण्यास इच्छुक असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
प्लाझ्मा थेरेपीमध्ये कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरेपी फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे प्लाझ्मा बँक तयार करणे आणि शास्त्रीय पद्धतीने प्लाझ्मा उपलब्ध करून देणे ही जबाबदारी असल्याचे समजून चांदूर रेल्वेमध्ये छत्रपती रक्तदान सेवातर्फे दात्यांची नावे गोळा करणे सुरू केले आहे. यासाठी डॉ. सागर वाघ, प्रावीण्य देशमुख, सौरभ इंगळे व चेतन भोले हे चौघे कार्य करीत आहेत. त्यामुळे इच्छुक दात्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन छत्रपती रक्तदान सेवा यांच्यावतीने करण्यात आले आहे.