नागरिक त्रस्त : पोलीस आयुक्तांचे चौकशीचे आदेशअमरावती : खोलापुरी गेट पोलीस ठाण्यांतर्गत रंगारी गल्लीत एका युवकाच्या दादागिरीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याच्याविरोधात अनेक तक्रारी दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी अखेर पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली. त्यांनी तत्काळ पोलीस निरीक्षकांना सूचना देऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच गुंडाला पकडून पोलीस आयुक्तांसमोर हजर केलेजाणार आहे. रंगारी गल्लीतील सत्यनारायण नगरातील रहिवासी राजू छांगाणी याने मद्यधुंद अवस्थेत किरण गोयनका व त्यांचा मुलगा निखील गोयनका याना बेदम मारहाण केली. यापूर्वी सुध्दा त्याने अनेक रहिवाशांना मारहाण केली असून त्यांनी भीतीपोटी तक्रार केली नाही. मात्र, आता नगरसेविका अर्चना राजगुरे व रश्मी नावंदर यांच्या पुढाकाराने बुधवारी किरण गोयनका, निखील गोयनका, पायल शर्मा, सतीश शर्मा यांच्यासह इतर रहिवाशांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांशी तत्काळ दूरध्वनीवरून संपर्क करून त्यांची कानउघाडणी केली. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून गुंडाला पकडून तातडीने त्यांच्या समक्ष सादर करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच या प्रकरणाचा संपूर्ण लेखाजोखा तत्काळ सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी खोलापुरी गेट ठाण्याच्या ठाणेदारांना दिल्या आहेत.
रंगारी गल्लीत युवकाची दादागिरी
By admin | Published: March 24, 2016 12:25 AM