अमरावती : महावितरणकडून होत असलेली वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबविण्याच्या मागणीसाठी अंजनगाव सुर्जी येथे युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ‘शोले’ आंदोलन केले. मोबाईल टॉवरवर उंचावर त्यांनी ठाण मांडले. पोलिसांनी मागण्या मान्य होण्यापूर्वी खाली उतरविण्याचा प्रयत्न केल्यास उडी घेऊ, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. सायंकाळी एक महिन्याच्या मुदतीच्या आश्वासनावर ते खाली उतरले.
आधीच चार-पाच वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असताना सन २०१९ पासून कोरोनाने सर्व काही संपविले. अशा बिकट परिस्थितीत जीवन कसे जगायचे, ही काळजी असताना महावितरणकडून शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती करीत जबरीने वसुली करण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या मोहिमेला स्थगिती मिळावी, ही वसुली मेनंतर सुरू करावी, या मागणीसाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २ फेब्रवारी रोजी सकाळपासून अंजनगाव सुर्जी येथील मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले होते. युवा स्वाभिमानचे मंगेश कोकाटे, विठ्ठल ढोले, अजय देशमुख हे टॉवरवर चढून बसले.
ज्यांनी बिलाचा भरणा अद्याप केलेला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांचा वीजपुरवठा त्वरित चालू करून करावी, वीज तोडणी मोहीम त्वरित थांबवावी, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवू. त्यापूर्वी पोलीस प्रशासनाने आम्हाला उतरविण्यासाठी पाऊल उचलले, तर आम्ही टॉवरवरून उडी घेऊ, अशा प्रतिक्रिया टॉवरवर चढलेल्या तिन्ही पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना दिली. आंदोलनस्थळी सकाळपासूनच युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते, व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी सहायक उपनिरीक्षक विशाल पोळकर व इनामदार यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, सहायक अभियंता संदीर गुजर यांनी आंदोलकांशी संवाद साधला. आधी आठ दिवसांची मुदत नाकारल्यानंतर त्यांनी वीज बिल भरण्यास एक महिन्याची मुदत दिली. त्यावर समाधान मानत आंदोलक सायंकाळी ६ च्या सुमारास टॉवरवरून उतरले.
एक महिन्यापर्यंत कुठलेही कनेक्शन बंद करण्यात येणार नाही. त्यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांना पाच हजार रुपये तातडीने भरावे लागतील.
- संदीप गुजर, सहायक अभियंता
शेतकरी अस्मानी संकटांमुळे हैराण झाला आहे. राज्याच्या महाविकास आघाडी सरकार ता शेतकऱ्यांचा वीजपुरवठा कापत आहे. त्यामुळे युवा स्वाभिमानला शेतकऱ्यांच्या हितार्थ आंदोलन करावे लागले. वीजपुरवठा खंडित करणे बंद केले नाही, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील.
- रवि राणा, आमदार, बडनेरा