अमरावती : महापालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सीने सध्या कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना ११,६०० रुपये अनामत रक्कम जमा करण्यासाठी जारी केलेला फतवा उधळून लावण्यासाठी युवा स्वाभिमान संघटनेने मंगळवारी सभागृहात राडा केला. चक्क सभागृहात प्रवेश करून ठिय्या दिला आणि आक्रमकपणे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांङल्या. अर्धातास गोंधळ चालला. महापौर, उपमहापौर, आयुक्तांसमोर जोरदार नारेबाजी देत सभागृहाचे लक्ष वेधले. अखेर सुरक्षा रक्षकांनी कार्यकर्त्यांना कसेबसे बाहेर काढले, हे विशेष.
उच्च शिक्षित, शिक्षित आणि अल्प शिक्षित असे एकूण २९५ मनुष्यबळ पुरविण्यासाठी नोएडा येथील ईटकॉन्स एजन्सीकडे कंत्राट सोपविला आहे. मात्र, हल्ली महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा रोजगार कायम ठेवायचा असेल तर विम्याच्या नावाखाली ११,६०० रूपये अनामत रक्कम जमा करण्यासाठी फोनद्धारे तगादा लावला जात आहे. तुटपुंज्या रकमेतून उदरनिर्वाह चालविणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपुढे हे नवीन संकट उभे ठाकल्याने आमदार रवि राणा यांच्याकडे त्यांनी धाव घेतली. त्यांना न्याय मिळावा, या भावनेतून युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जीतू दुधाने यांच्या नेतृत्वात सभागृहात प्रश्न सोडविण्यासाठी धाव घेण्यात आली. मात्र, सभागृहाचे कामकाज सुरू असताना प्रवेश केला आणि जोरदार नारेबाजी देत प्रशासनाचा निषेध नोंदविला गेला. सभागृहात आंदोलन केल्याने भाजप, सेना, काँग्रेस, बसपा, एमआयएम, रिपाइं आदी सदस्यांनी युवा स्वाभिमानच्या या कृतीचा निषेध करीत नियमानुसार गुन्हे नोंदविण्याची मागणी केली. सदस्यांच्या भावना आणि लोकशाही प्रक्रियेला छेद देणारी घटना असल्याचे नमूद करून महापौर चेतन गावंडे यांनी सभागृहात राडा करणाऱ्याविरूद्ध फौजदारी कारवाई करावी, असा निर्णय घेत प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले.
-------------------
राणा यांच्याविरूद्ध सर्वपक्षीय सदस्य एकवटले
कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी आमदार रवि राणा यांच्याद्धारा स्थापित युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सभागृहात गोंधळ घातला. एजन्सीचा करार रद्द करण्यासाठी जोरदार नारेबाजी करण्यात आली. या नियमबाह्य कृतीचा निषेध नोंदवित तुषार भारतीय, बबलू शेखावत, विलास इंगोले, प्रकाश बनसोड, मिलिंद चिमोटे, प्रशांत वानखडे, चेतन पवार, मंजूषा जाधव, राजेंद्र तायडे, सलिम बेग, धीरज हिवसे, अजय गोंडाणे, सुनील काळे, मो. नाजीम, राधा कुरील आदी सर्वपक्षीय सदस्य आमदार रवि राणा यांच्यविरूद्ध एकवटले. मात्र, यावेळी युवा स्वाभिमानचे तीन नगरसेवक हजर नव्हते.