निवडणूक : पदाधिकाऱ्यांसह सदस्य प्रचारात व्यस्त
अमरावती : सध्या जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणूक असल्याने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य प्रचारात व्यस्त, तर अधिकारी-कर्मचारी यांनाही निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सर्वत्र शुकशुकाट असल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले.
जिल्ह्यातील ५५३ पैकी १२ अविरोध झाल्यानंतर ५४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना चिन्हवाटप झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ असलेल्या जिल्हा परिषदेमार्फत कोट्यावधी रुपयांची विकासकामे या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात केली जातात. त्यामुळे जिल्हा परिषदेचा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीच्या रूपाने वर्चस्व गाजविण्याची वेळ आल्याने ग्रामीण भागातच सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेत कामांसाठी येणाऱ्या अभ्यागतांची संख्या रोडावली आहे. येत्या १५ जानेवारीपर्यंत हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. मतदानानंतर जिल्हा परिषदेत वर्दळ वाढणार आहे.
बॉक्स
प्रतिष्ठा पणाला
ग्रामपंचायतीपासून राजकीय सुरुवात झालेल्या नेत्यांची वाटचाल जिल्हा परिषदेत ते आमदारकीपर्यंत झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही नेत्यांसाठी महत्त्वाची असून, आगामी जिल्हा परिषदेची ही रंगीत तालीम समजली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.