कृषी दिन : पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी इतरांनाही द्यावे प्रोत्साहन, प्रकाश साबळे
अमरावती : जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त शेतकरी बांधवांचे शेतीतील अभिनव प्रयोग मार्गदर्शक ठरणार आहेत. विविध कारणांमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना या प्रयोगांची माहिती देऊन प्रोत्साहित करावे, जेणेकरून ते जोमाने शेती करून सुजलाम् सुफलाम् होऊ शकतात, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी गुरुवारी येथे केले.
हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील १५ प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाला. त्यावेळी प्रकाश बोबडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती विठ्ठल चव्हाण होते. यावेळी सदस्य प्रकाश साबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. विजय राहाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, कृषी अधिकारी अनिल खर्चान, जिल्हा कृषी विकास अधिकारी उज्ज्वल आगरकर आदी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विजय चवाळे, तर संचालन विवेक ढोमणे व आभार प्रदर्शन उज्ज्वल आगरकर यांनी केले. कार्यक्रमाला शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बॉक्स
रबी पीक स्पर्धेचे हे मानकरी
रबी हरभरा सर्वसाधारण गटात खारतळेगाव येथील आशिष क्षीरसागर, अंतरगाव येथील इंदूबाई धर्माळे, संग्रामपूर येथील भास्कर गावंडे, रबी गहू सर्वसाधारण गटात चौसाळा येथील नितीन घनमोडे, माणिकपूर येथील तुळशीराम मोरोपे, कुलंगणा येथील गनानन पोरे आणि रबी गहू आदिवासी गटातून बोराळा येथील रामदास बेठे, बिजू बेठे व झिंगापूर येथील श्रीराव चिलात्रे यांचा गौरव कृषिदिनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विभागातून सालोरा येथील ज्ञानेश्वर येवले या शेतकऱ्याला गौरविले गेले.
बॉक्स
खरीप पिकांसाठी या शेतकऱ्यांचा गौरव
उत्कृष्ट कापूस उत्पादक शेतकरी म्हणून आकाश कोकाटे (धानोरा कोकाटे, अमरावती), तर सोयाबीन, तूर, कापूस व अन्य पिकांचे विक्रमी उत्पादक भूषण पाटील (निरूळ गंगामाई, ता. भातकुली), विमला साव (मार्डा, ता. तिवसा), चंद्रशेखर बंड (शिरजगाव, ता. मोर्शी), सतीश कोरडे (जसापूर, ता. चांदूर बाजार), रामचंद्र खडसे (बेबळा बु., ता. दर्यापूर), रंगराव शिंगणे (कोतेगाव, ता. अंजनगाव सुर्जी), श्यामकांत करडे (येलकी पूर्णा), विनोद खेरडे (धोतरखेडा, ता. अचलपूर), सुशील नवखरे (अडगाव बु., नांदगाव खंडेश्र्वर), विजय बाबर (सोनगाव, ता. चांदूर रेल्वे), निखिल डुबे (आजनगाव, ता. धामणगाव रेल्वे), योगेश देशमुख (टेंभूरखेडा, ता. वरूड), रामगोपाल मावस्कर (टिटंबा, ता.धारणी), गणाजी जांबू (बोराळा, ता. चिलखदरा) यांचा समावेश आहे.