अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांची कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी ७ मे रोजी जारी केले. आरोग्य सेवा व ग्रामपंचायत विभाग यातून वगळण्यात आले आहेत.
जिल्ह्यात १५ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधिनस्थ कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढले. त्यानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. १५ मेपर्यंत कार्यालये बंद ठेवावीत. कामकाज सुरू ठेवायचे असल्यास ऑनलाइन पद्धतीने काम करावे, अशा सूचना सीईओ अविश्यांत पंडा यांनी आदेशात दिल्या आहेत. आरोग्य सेवा व ग्रामपंचायत आणि अत्याश्यक कार्यालये मात्र सुरू राहणार आहेत. दोन्ही यंत्रणा कोरोनाकाळात अतिशय महत्त्वाच्या असल्याने यामधून या कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे.
बॉक्स
अभ्यासगतांनाही नो एन्ट्री
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांनाही मुख्यालयास प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. विभागाप्रमुखांकडे कामासंदर्भात द्यायची निवेदने, तक्रारी या जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या ई-मेलवर किंवा व्हॉट्सॲपवर पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
बॉक्स
- तर कारवाईचा बडगा
जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थित राहून त्यांच्या कार्यालयप्रमुखांच्या संपर्कात राहावे व भ्रमणध्वनी सुरू ठेवावे. आवश्यकता भासल्यास कार्यालयास उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तथापि, कोणत्याही कारणास्तव संपर्कास प्रतिसाद न दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई होईल, असा इशारा अविश्यांत पंडा यांनी दिला आहे.