अमरावती : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ११ पंचायत समित्यांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात येणार आहे. यावेळी लोकसंख्येच्या आधारे सदस्यसंख्या निश्चित केली जाणार आहे. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामीण लोकसंख्येचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना मागितला आहे.
प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीकरिता जिल्ह्याच्या सन २०११ च्या जणगणनेनुसार माहिती आवश्यक आहे. त्यामुळे आयोगाने ही माहिती विहित प्रपत्रानुसार जिल्हा प्रशासनाला मागितली आहे. यामध्ये ग्रामीण लोकसंख्येत नव्याने झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत व महापालिकेच्या हद्दवाढ क्षेत्राची लोकसंख्या वगळून तालुकानिहाय लोकसंख्येची माहिती जिल्हा प्रशासनाने मागितली असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.
बॉक्स
महापालिकेतही लवकरच लगबग
महापालिकेची मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपत आहे. त्यामुळे लवकरच आता निवडणूक आयोगाद्वारे प्रभागरचना होणार आहे. यावेळी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग राहणार आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात वारे वाहायला लागले आहेत. नव्या प्रभागरचनेनुसार बहुतांश नगरसेवक कामाला लागले आहेत.