अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन अदा करण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन थेट जिल्हास्तरावरून सीएमपी प्रणालीद्वारे शिक्षकांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे ७५ टक्के काम पूर्ण झाली आहेत. उर्वरित काम आगामी काही दिवसांत पूर्ण होईल. त्यामुळे येत्या सष्टेंबर किंवा ऑक्टोंबर महिन्यापासून शिक्षकांना सीएमपी प्रणालीद्वारे वेतन अदा करण्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत.
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची देयके सादर करणे तसेच प्रत्यक्ष वेतन भत्ता अदा करण्यासाठी सध्या कार्यान्वित पद्धतीतील प्रशासकीय व तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांचे वेतन अदा करण्यास विलंब होतो. हा विलंब टाळण्यासाठी आणि दरमहा एक तारखेला शिक्षकांचे वेतन थेट जिल्हास्तरावरून सीएमपी प्रणालीद्वारे शिक्षकांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. त्यासाठी ज्या बँक खात्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन जमा होणे अपेक्षित आहे. ते संबंधित बँक खाते अद्यावत करण्याचे काम शिक्षण विभागाकडून जवळपास पूर्ण झाले आहेत. उर्वरित कामाची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरू आहे. ही प्रक्रिया आटोपताच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीद्वारे होणार असून, त्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या प्रणालीसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह शिक्षण सभापती सुरेश निमकर यांनी पुढाकार घेऊन ही प्रणाली जिल्हा परिषदेने सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना वेळाने मिळणारे वेतन या प्रणालीमुळे वेळेत मिळणार आहे.
कोट
प्राथमिक शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करण्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय कामकाज ७५ टक्के झाले आहे.उर्वरित कामकाज बॅकेसोबत समन्वय साधून पूर्ण केले जाईल. त्यानंतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपासून वेतनाची प्रक्रिया ही सीएमपी प्रणालीद्वारे राबविली जाईल.
- एजाज खान, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक)