बीडीओ मारहाणीचा निषेध : दोषी पदाधिकाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई करा अमरावती : तिवसा पंचायत समितीचे बीडीओ किशोर काळे यांना सोमवारी महिला सभापती, उपसभापती, सदस्य व अन्य व्यक्तींनी कक्षात जाऊन मारहाण केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. याचे पडसाद बुधवारीही जिल्हा परिषदेत उमटले. जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन पुकारल्याने दुसऱ्या दिवशीही जिल्हा परिषदेतील सर्वच विभागाचे कामकाज पूर्णत: ठप्प पडले होते. जोपर्यंत या घटनेतील दोषी पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरविण्यात येणार नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तिवसा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी (उच्च श्रेणी) किशोर काळे यांना सोमवारी त्यांच्या कक्षात सभापती अर्चना वेरुळकर, उपसभापती गौरी देशमुख, सदस्य श्याम देशमुख, सभापतीचे पती प्रल्हाद वेरुळकर, उपसभापती पती संजय देशमुख व ठाणाठुणीचे उपसरपंच अनुप अढाऊ यांनी शिविगाळ करुन मारहाण केल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्याला मारहाण केल्याने जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केले. अधिकारी, कर्मचारी संघटनेव्दारा जि.प.चे अध्यक्ष सतीश उईके यांना निवेदन देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. गटविकास अधिकारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष सुनील निकम, जे.एन आभाळे, बी.बी. बहिरम, पी.जी.भागवत, नितीन भालेराव, चंद्रशेखर खंडारे, सुभाष बोडखे, बीडीओ प्रमोद कापडे, अरविंद गुळदे, नरेंद्र धारगे, रामकृष्ण पवार, तुकाराम टेकाडे, सतीश खानंदे, दिलीप मानकर, जि.प.कर्मचारी युनियनचे पंकज गुल्हाने, ज्ञानेश्र्वर घाटे मंगेश मानकर, प्रशांत धर्माळे, विजय कविटकर, ऋषी कोकाटे, प्रमोद ताडे, अमोल कावरे, नीलेश तालन, लिलाधर नांदणे, राजेश अडगोकार, तारकेश्वर घोटेकर, अनुप सोलव, मनीष पंचगाम, मनीष गिरी, आर. यू. मुळे यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा या आंदोलनात सहभाग आहे. यामुळे कामकाज प्रभावित झाले आहे. प़ंस़ कर्मचाऱ्यांचेही काम बंद धामणगाव रेल्वे : तिवसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर काळे यांना मारहाण केल्याप्रकरणी दुसऱ्या दिवशीही धामणगाव पंचायत समिती मधील तब्बल चाळीस कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले़ यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या जनतेची प्रचंड गैरसोय झाली़सोमवारी तिवसा येथील गटविकास अधिकाऱ्यांना येथीलच उपसभापतींनी कक्षात जावून मारहाण केली. या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटले. दुसऱ्या दिवशीही धामणगावात पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी दिवसभर पंचायत समिती कार्यालयाबाहेर बसून धरणे दिले़ पदाधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत कोणताही कर्मचारी प्रशासकीय कामकाज करणार नाही, असा ईशारा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के.बी़देशमुख यांनी दिला़आंदोलनात गटविकास अधिकारी बी़ए़घुगे, के.बी़ देशमुख, एस़व्ही़ सातपुते, एस़पी़ यादव, के.एफ.पिल्लारे, एम़आऱ औतकर, प्रमोद डोंगरे, सदाशिव रत्नपारखी, सांगळे, पाटील, चव्हाण, मनीष शेळके, सूर्यकांत गजघाटे, संजय ठाकरे, संदीप कोहे आदींचा सहभाग आहे.
जि.प. मध्ये दुसऱ्या दिवशीही प्रशासकीय कामकाज ठप्प
By admin | Published: June 18, 2015 12:22 AM